सोमवार, १५ जानेवारी, २०१८

अभिजातता...!


सुचेताताईंनी अत्यंत समर्पक आणि प्रभावी शब्दात मांडलेल्या ‘अभिजातताते’च्या व्याख्या केवळ रसिकांच्याच नव्हे तर त्यांच्या सोबत मंचावरील परिसंवादात सहभागी ‘कलाकारां’च्या देखील हृदयाचा ठाव घेवून गेल्या याचा दाखला म्हणजे पंडित सत्यशील देशपांडेंनी आपले विवेचन सुरु करण्यापूर्वी सुचेताताईंकडून त्या व्याख्या लिहिलेला कागद मागून त्या सर्व समीकरणांचे जाहीर पुनर्वाचन केले!

संगीत, नृत्य, चित्र अशा निर्विवादपणे अभिजात असलेल्या कलाप्रकारांच्या साधकांना त्यांना उमगलेले अभिजातातेचे स्वरूप उलगडून सांगण्याची आयोजकांची कल्पना जेवढी कल्पक तेवढीच, त्यामध्ये ‘व्यवसाय’ या क्षेत्राचा अभिजाततेवरील परिसंवादात अंतर्भाव करण्याचे धाडस उल्लेखनीय! श्री. दीपक घैसास यांनी स्वत:चा, ‘पंचपक्वानांच्या ताटातील ऑम्लेटचा तुकडा’ असा विनयशील परिचय देत, व्यवहारकुशलेतेची आस्वादक संवेदनशीलता आणि आध्यात्मिक रसिकता यांच्याशी सांगड घालत समृद्ध आयुष्य जगण्याच्या भानाचे जे नमुने पेश केले ते त्यांना उकडीच्या मोदकाचा दर्जा देवून गेले! ‘पायाने केला तर प्रवास होतो, हृदयाने केली तर यात्रा होते आणि भान हरपून केली तर वारी होते’ हे उदाहरण किंवा, ‘व्यवसायात रोज नव्याने येणाऱ्या आव्हानांना कुठलीही पुर्वनिश्चिती नसल्याने त्यांच्या हाताळणीत दाखवावी लागणारी सृजनशिलता हे अभिजाततेचे एक स्वरूप असू शकते’ या मांडणीतून त्यांनी पंडीत सत्यशीलजींचा ‘एकाच रागाची नव्याने सादरीकरणातील प्रयोगशीलता व ती प्रक्रिया म्हणजेच अभिजातता’ याचे ‘आधा है चंद्रमा...’ च्या उदाहरणासह केलेले स्पष्टीकरण अधोरेखित तर केलेच शिवाय ते त्यांच्या अभिजाततेची साक्ष देणारे देखील ठरले.

पंडितजींनी आपल्या खुमासदार शैलीत सांगीतिक पद्धतीने केलेली विषयाची उकल रसिकांची दाद मिळवून गेली आणि त्यांच्या ‘सतत नवीन शिकण्याची, प्रयोग करण्याची उर्मी हे जिवंत मनाचे आणि कंटाळा येणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे’ या विधानांबरोबरच ‘क्लासिक’च्या व्याख्येतील गमती जमती वरील मार्मिक भाष्य आणि पु. शि. रेग्यांच्या ‘आसमंत रोज नवा, ‘इथे-तिथे’ची वानवा!’ या ओळींनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

रवि परांजपे सरांनी दोन पाश्चात्य कलाकारांच्या आविष्कारांच्या उदाहरणातून ‘Great Minds Think Alike’ अथवा ‘ये हृदयीचे ते हृदयी...’ याचे दर्शन अभिजाततेचे एक अंग कसे असू शकते आणि दोन वा अधिक अवकाशांचा सहसंबंध आणि त्यातील अभिजातता काही चित्रांच्या उदाहरणातून उलगडून दाखवली.

सूत्रधार मिलिंद अग्निहोत्री यांनी सांगितले की पंडित सत्यशिलजींना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यासाठी भेटलो असता त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, ‘कार्यक्रम किती वेळाचा आहे?’, ‘दोन तासांचा...’ असे उत्तर मिळाल्यावर पंडितजी ताडकन म्हणाले, ‘जमणार नाही, या विषयावरील असा कार्यक्रम किमान चार दिवसांचा हवा, अन्यथा तुम्ही रसिकांसह सगळ्यांचाच वेळ फुकट घालवाल...!’

याचा जाणीवपूर्वक उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, कुणाचाही वेळ फुकट तर गेला नाहीच उलट मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अभिजनांच्या आश्वासक प्रतिसाद व सहभागाने अभिजाततेतील एका नवीन संक्रमणांस आयोजकांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले हे एक आणि दुसरे म्हणजे पंडितजींच्या तर्कास असुसरून या 'अमूर्त कल्पनेला मूर्त स्वरुपात बांधण्याच्या' या प्रयत्नाबद्दल कितीही लिहिले तरी अपूर्णच वाटेल. तेंव्हा तूर्तास, सृजनशील मनांना संवेदनांच्या अभिसरणाची अतिशय उत्तम संधी देण्याच्या प्रयोगाबद्दल रवि परांजपे फौंडेशनचे मन:पूर्वक आभार मानून या उपक्रमातील पुढील कार्यक्रमाच्या प्रतिक्षेत थांबावे हे उचित!

जाता जाता – सन्मित्र डॉक्टर सचिन चिंगरे यांच्याशी या विषयी चर्चा करतांना, ‘कुठल्याही निर्मिती प्रक्रीयेतील प्रामाणिक प्रयत्नांचे सातत्य म्हणजे अभिजातता...’ हे त्यांचे निरीक्षण आणि कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेपासून या क्षणापर्यंत आम्हाला या विषयाचे प्रतीकात्मक रूपक म्हणून दृष्टांत देणाऱ्या 'वडाच्या पारंब्यां'चा उल्लेख इथे सयुक्तिक व वाचकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा ठरावा!

न हि रसादृते कश्चिदर्थः प्रवर्तते...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा