रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

ध्रुव हालतो...?



नीतीचा भोक्ता, मनाचा सच्चा आणि शब्दाचा पक्का माणूस आपले परखड मत कधीही, कुठेही आणि कसेही व्यक्त करण्यास मुळीच कचरत नाही... ते स्वत:बद्दलचे आणि अव्यवहार्य ठरू शकणारे असले तरी! आत्मभान ही मानवी अस्तित्वाची उन्नत पायरी असली, आत्मस्तुती किंवा आत्मवंचना ही आत्मचरित्राचीच ‘स्वान्त सुखाय’ पाने असली आणि उदासीन आत्मपरीक्षण आणि त्याच्या साक्षेपी विश्लेषणाचे काव्यात्म प्रकटीकरण हे प्रसंगी आत्ममग्नतेचे लक्षण वाटले तरी ते अनुभूतीचे भावविश्व जेव्हा वैयक्तिक न राहता वैश्विक होत समस्त मानवांना सामावून घेते तेव्हा त्याचे बदलले परिमाण केवळ एका घायाळ पराभवाचा विषाद न उरता ‘विश्वाचे आर्त’ मांडणारा निषाद ठरतो! अगदी कोवळ्या वयात अशा अथांगतेचे सार उमजण्यास ज्ञानेश्वर जन्मावा लागतो आणि ‘अगदी माझ्याच मनीचे बोल हे...’ असे सर्वसामान्यांस वाटायला लावणारा भाव शब्दात बांधण्यास तो कवि करंदीकर असावा लागतो...

विंदांच्या माझ्या हृदयस्थ कवितांमध्ये मानाचे स्थान असलेली जातक मधील ही आर्त गझल...?

मी ऐकले ध्रुव हालतो

मी ऐकले ध्रुव हालतो, त्याचे काही वाटले;
माझेच काही मागचे माझ्या गळ्याशी दाटले.

विजनातल्या सुपथावरी तुजला दिल्या शपथा किती,
रहदारिच्या रस्त्यावरी ते शब्द आता फाटले.

अयशात होतो धुंद अन् सुयशात झालो सुंद मी;
हरवून माझा ध्यास मी हे काय भलते गाठले.

पंखात होती झेप अन् डंखात होती चेतना;
मी पाय येथे रोवण्या ते पंख माझे काटले.

गर्दीत मी घुसलो किती; जेथे कोणी सोबती.
साथीस उरली सावली... हे सोंग माझे कोठले?

होता कुठे, आला कुठे - तो शाश्वताचा सारथी!
दर्याच सरला मागुती की सांडपाणी आटले?

जातक, १९६५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा