रविवार, २१ जानेवारी, २०१८

हा रस्ता अटळ आहे !

सूज्ञ, विवेकी आणि संवेदनशील मनाची कुचंबणा आणि घुसमट मांडतांना देखील अत्यंत आशादायी आणि सकारात्मक शेवट करणारी विंदांची ही एक अद्भुत कविता जी अनेक अर्थाने एकमेवाद्वितीय ठरली. चित्रकर्त्यांना ती आपल्या निर्मितीच्या प्रचारासाठी एक प्रभावी साधन वाटली (गजेंद्र अहिरेचा चित्रपट - शासन), लेखकांना आपल्या अभिव्यक्तीस याहून समर्पक शीर्षक नाही असे वाटले (रामचंद्र नलावडे यांचा कथासंग्रह) तर इंग्रजीत शब्दश: अनुवाद केलेली माझ्या माहितीतील विंदांची ही एकमेव रचना (सुरेश रानडे यांचा ब्लॉग ज्ञानदीप). आज विंदांची ही १०१ वी कविता सादर करून मी माझ्या विंदांच्या जन्मशताब्दी उपक्रमाची सांगता करतो आहे, यापुढेही वेगवेगळ्या निमित्तांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रकटण्याचा प्रयत्न करीन, कारण माझ्यासाठी... हा रस्ता अटळ आहे!


माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !

अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे ! 

ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे !

येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य! 
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!
बन दगड आजपासून 
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !

अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड...!

शनिवार, २० जानेवारी, २०१८

रे खिन्न मना...!



‘मरणात खरोखर जग जगते...’ केवळ चार शब्दात समग्र मानवी आयुष्याचा आशय मांडणाऱ्या कवीची ताकद त्याच्या अत्यंत प्रभावी आणि समृद्ध शब्दांनी ‘जगण्याला’ सहज कवेत घेते! हे लिहिणाऱ्या भा. रा. तांब्यांच्या, अशाच एका आशय’घन’ रचनेला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरसाज चढवून मराठी भावविश्वात अजरामर केले. अलीकडे आलेल्या ‘हाय वे – एक सेल्फी आरपार’ या उमेश कुलकर्णीच्या आणखी एका दर्जेदार निर्मितीच्या माध्यमातून आणि, चेहऱ्याइतकाच गळ्यातही गोडवा असलेल्या, रेणुका शहाणे यांच्या गुणगुण्यातून या जवळपासविस्मृतीत गेलेल्या गीताला स्मृतीपटलावर प्रवेश मिळाला होताचं; कालच्या सावनी रविंद्र प्रस्तुत ‘स्वर हृदयांतरी’मध्ये खुद्द पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्या तोंडून या भावगीताची महती निरुपण सदृश विवेचनातून ऐकतांना रसिकांना आपल्या भाग्याचा हेवा न वाटता तरच नवल! या गीतातील शेवटचा अंतरा सहसा गायला जात नाही अशी खंत व्यक्त करतांना पंडितजींनी तो संपूर्ण अंतरा विशद करून दाखविला आणि तो ऐकतांना आम्हाला वात्सल्य, प्रेम, प्रपंच, अध्यात्म असा सगळा भावानुभव एकत्रित मिळाला याचे कारण सूज्ञांस सांगणे न लगे...!

भा. रा. तांबेच्या ज्या गीताच्या नमनाला हे घडाभर तेल घातले ते गीत...

‘घन तमीं शुक्र बघ राज्य करी,
रे खिन्न मना, बघ जरा तरी...!’

आणि सहसा स्वरांत न गुंफलेला हा शेवटचा अंतरा...

'मना, वृथा कां भीशी मरणा?
दार सुखाचें तें हरि–करुणा!
आई पाही वाट रे मना,
पसरोनी बाहु कवळण्या उरीं...'


सोमवार, १५ जानेवारी, २०१८

अभिजातता...!


सुचेताताईंनी अत्यंत समर्पक आणि प्रभावी शब्दात मांडलेल्या ‘अभिजातताते’च्या व्याख्या केवळ रसिकांच्याच नव्हे तर त्यांच्या सोबत मंचावरील परिसंवादात सहभागी ‘कलाकारां’च्या देखील हृदयाचा ठाव घेवून गेल्या याचा दाखला म्हणजे पंडित सत्यशील देशपांडेंनी आपले विवेचन सुरु करण्यापूर्वी सुचेताताईंकडून त्या व्याख्या लिहिलेला कागद मागून त्या सर्व समीकरणांचे जाहीर पुनर्वाचन केले!

संगीत, नृत्य, चित्र अशा निर्विवादपणे अभिजात असलेल्या कलाप्रकारांच्या साधकांना त्यांना उमगलेले अभिजातातेचे स्वरूप उलगडून सांगण्याची आयोजकांची कल्पना जेवढी कल्पक तेवढीच, त्यामध्ये ‘व्यवसाय’ या क्षेत्राचा अभिजाततेवरील परिसंवादात अंतर्भाव करण्याचे धाडस उल्लेखनीय! श्री. दीपक घैसास यांनी स्वत:चा, ‘पंचपक्वानांच्या ताटातील ऑम्लेटचा तुकडा’ असा विनयशील परिचय देत, व्यवहारकुशलेतेची आस्वादक संवेदनशीलता आणि आध्यात्मिक रसिकता यांच्याशी सांगड घालत समृद्ध आयुष्य जगण्याच्या भानाचे जे नमुने पेश केले ते त्यांना उकडीच्या मोदकाचा दर्जा देवून गेले! ‘पायाने केला तर प्रवास होतो, हृदयाने केली तर यात्रा होते आणि भान हरपून केली तर वारी होते’ हे उदाहरण किंवा, ‘व्यवसायात रोज नव्याने येणाऱ्या आव्हानांना कुठलीही पुर्वनिश्चिती नसल्याने त्यांच्या हाताळणीत दाखवावी लागणारी सृजनशिलता हे अभिजाततेचे एक स्वरूप असू शकते’ या मांडणीतून त्यांनी पंडीत सत्यशीलजींचा ‘एकाच रागाची नव्याने सादरीकरणातील प्रयोगशीलता व ती प्रक्रिया म्हणजेच अभिजातता’ याचे ‘आधा है चंद्रमा...’ च्या उदाहरणासह केलेले स्पष्टीकरण अधोरेखित तर केलेच शिवाय ते त्यांच्या अभिजाततेची साक्ष देणारे देखील ठरले.

पंडितजींनी आपल्या खुमासदार शैलीत सांगीतिक पद्धतीने केलेली विषयाची उकल रसिकांची दाद मिळवून गेली आणि त्यांच्या ‘सतत नवीन शिकण्याची, प्रयोग करण्याची उर्मी हे जिवंत मनाचे आणि कंटाळा येणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे’ या विधानांबरोबरच ‘क्लासिक’च्या व्याख्येतील गमती जमती वरील मार्मिक भाष्य आणि पु. शि. रेग्यांच्या ‘आसमंत रोज नवा, ‘इथे-तिथे’ची वानवा!’ या ओळींनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

रवि परांजपे सरांनी दोन पाश्चात्य कलाकारांच्या आविष्कारांच्या उदाहरणातून ‘Great Minds Think Alike’ अथवा ‘ये हृदयीचे ते हृदयी...’ याचे दर्शन अभिजाततेचे एक अंग कसे असू शकते आणि दोन वा अधिक अवकाशांचा सहसंबंध आणि त्यातील अभिजातता काही चित्रांच्या उदाहरणातून उलगडून दाखवली.

सूत्रधार मिलिंद अग्निहोत्री यांनी सांगितले की पंडित सत्यशिलजींना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यासाठी भेटलो असता त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, ‘कार्यक्रम किती वेळाचा आहे?’, ‘दोन तासांचा...’ असे उत्तर मिळाल्यावर पंडितजी ताडकन म्हणाले, ‘जमणार नाही, या विषयावरील असा कार्यक्रम किमान चार दिवसांचा हवा, अन्यथा तुम्ही रसिकांसह सगळ्यांचाच वेळ फुकट घालवाल...!’

याचा जाणीवपूर्वक उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, कुणाचाही वेळ फुकट तर गेला नाहीच उलट मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अभिजनांच्या आश्वासक प्रतिसाद व सहभागाने अभिजाततेतील एका नवीन संक्रमणांस आयोजकांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले हे एक आणि दुसरे म्हणजे पंडितजींच्या तर्कास असुसरून या 'अमूर्त कल्पनेला मूर्त स्वरुपात बांधण्याच्या' या प्रयत्नाबद्दल कितीही लिहिले तरी अपूर्णच वाटेल. तेंव्हा तूर्तास, सृजनशील मनांना संवेदनांच्या अभिसरणाची अतिशय उत्तम संधी देण्याच्या प्रयोगाबद्दल रवि परांजपे फौंडेशनचे मन:पूर्वक आभार मानून या उपक्रमातील पुढील कार्यक्रमाच्या प्रतिक्षेत थांबावे हे उचित!

जाता जाता – सन्मित्र डॉक्टर सचिन चिंगरे यांच्याशी या विषयी चर्चा करतांना, ‘कुठल्याही निर्मिती प्रक्रीयेतील प्रामाणिक प्रयत्नांचे सातत्य म्हणजे अभिजातता...’ हे त्यांचे निरीक्षण आणि कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेपासून या क्षणापर्यंत आम्हाला या विषयाचे प्रतीकात्मक रूपक म्हणून दृष्टांत देणाऱ्या 'वडाच्या पारंब्यां'चा उल्लेख इथे सयुक्तिक व वाचकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा ठरावा!

न हि रसादृते कश्चिदर्थः प्रवर्तते...!

रविवार, १४ जानेवारी, २०१८

प्रकटन...!

गुरुवार, दि. ४ जानेवारी २०१७च्या पुणे टाइम्स पुरवणीत 'मुलगी वाढवतांना...' या शीर्षकाखाली केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून सदर विषयातील आमची भूमिका व अनुभव पुणे टाईम्स टीमला इमेलद्वारा पाठविले होते, ते शनिवार, दि. १३ जानेवारी २०१८ च्या पुणे टाइम्स पुरवणीत संपादित स्वरुपात असे प्रकाशित झालेत...

तथापि अतिरिक्त संपादनाने मूळ लिखाणाचा बराचसा गाभा हरविला असे वाटल्याने आम्ही तसे मटा पुणे टाईम्स टीम व संपादकांना इमेलने कळविले परंतु त्यांस या क्षणापर्यंत तरी काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्हाला अनेक हितचिंतकांनी अभिनंदनाचे फोन / मेसेज केले असता झाला प्रकार आम्ही सांगितला तेंव्हा बहुतेकांनी मूळ लिखाण वाचण्याची इच्छा दर्शवली म्हणून मूळ लेख येथे देत आहोत. मटामधील छापील मजकुरावरील आपल्या अत्यंत मनस्वी व प्रेरणादायी प्रतिक्रियांबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत, मूळ लिखाणाबद्दलची आपली मते जाणून घ्यायला देखील आम्हाला आवडेल...

ती...


माझ्या शालेय जीवनात जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अशा इतिहासातील आणि वर्तमानातील इंदिरा गांधी या स्त्रियांच्या अलौकिक कर्तुत्वामुळे माझ्या मनात स्त्री विषयी आत्यंतिक आदरभाव तयार होण्यास मदत झाली. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ अशा बोधवचनांनी संस्कारक्षम मनाची मशागत केली. माझ्या स्वत:च्या आयुष्यात आई ते पत्नी अशा विविध भूमिकात माझी काळजी घेणाऱ्या सर्वच स्त्रियांची सहनशक्ती, कामाचा उरक आणि पुरुषांच्या तुलनेत पदोपदी जाणवणारी जगण्याची शहाणीव या सगळ्याचा एकत्रित परिणाम माझ्या स्त्री-विषयक मानसिक जडणघडणीत झाला. परिणामी मी, प्रेमात देखील पडण्यापूर्वी, एक निर्णय पक्का करून टाकला कि मला एकच अपत्य असेल आणि ती मुलगीच असेल! माझ्या सखी सहचरणीने स्त्री-सुलभ समजूतदारपणाने म्हणा किंवा उदारमतवादाच्या परंपरेने म्हणा, या विचाराला सहर्ष अनुमोदन देवून माझा दृढनिश्चय अधिकच बळकट केला! एवढी पार्श्वभूमी लाभलेल्या माझ्या मन:शक्तीला आव्हान देण्याचे धाडस न करता नियतीने माझी आंतरिक तळमळ ओळखून मला कन्यारत्नानेच सन्मानित केले!

माझ्या मुलीच्या जन्माप्रीत्यर्थ ‘पेढे’ वाटणाऱ्या मला जगरहाटीची मुळीच समज नाही हे प्रसूतिगृहातील अनुभवी परिचारिकेने तेथेच जाहीर करून टाकले! या क्रौंच पक्ष्याच्या रूपकाने मानवी साखळी अखंडित ठेवणाऱ्या समाज प्रतिनिधीच्या प्रतिक्रियेने, माझा आधीच दृढ असलेला निश्चय ‘वज्रादपि कठोर’ झाला आणि माझ्या नवजात कुलदिपिकेप्रती पहिल्या क्षणापासून ‘मृदुनि कुसुमादपि’ ठरला. अशा मनोभूमिकेतून जन्मलेल्या माझ्या वारसाला ‘मुलींसारखे’ वाढवण्याचा प्रश्नच नव्हता. अर्थात म्हणून तिला केस छोटे करून मुलाचे कपडे घालणे असले भंपक प्रकार आम्हाला कधीही करावेसे वाटले नाही. उलट तिच्या लांब केसांच्या दोन शेंड्या बांधण्यात मला जो आनंद मिळायचा तो अवर्णनीय होता आणि तिच्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे डिझायनर कपडे शिवण्याचा तिच्या आईचा उत्साह, ती आज कॉलेजला गेली तरी कमी झालेला नाही. दहावी आणि बारावी अशा दोन्ही पातळीवर नव्वदच्या पुढे मार्क मिळवून देखील कला शाखा निवडून, तत्वज्ञान विषयात प्रथम येणे आणि वयाच्या १९ व्या वर्षी, स्वत:च्या महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर काही सेवाभावी संस्थांच्या समाजकार्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणे, पुरुषही हाताळायला कचरतात अशा ‘एलजीबीटीक्यू’सारख्या संवेदनशील विषयांवर प्रबोधनपर माहितीपट बनविणे किंवा ‘लैंगिक अत्याचार विरोधी समितीचे कार्य’ अशा जाणीव जागृतीसाठी पथनाट्य सादर करणे, भरत नाट्यम शिकणे – जर्मन शिकविणे, गडकिल्ल्यांच्या ट्रेकच्या निमित्ताने रानोमाळ भटकंती करणे आणि यातून वेळ मिळेल तेव्हा घरी धावती भेट देणे – हे सगळे ती तिच्या चॉइसने आणि स्वत:च्या हिमतीवर करते याचे कारण तिला मिळणारा अवकाश!

‘प्रत्येक जीव हा स्वयंभू असतो आणि त्याने आपल्या क्षमतांचे पूर्ण विकसन करून आपले जीवित कार्य अत्यंत निष्ठेने करीत समाजाच्या घडणीत आणि राष्ट्राच्या उभारणीत आपले योगदान द्यावे’ हा गर्भसंस्कार झालेली माझी मुलगी आज मलाच, ‘एलजीबीटीक्यू’मधील बारकावे, ‘ह्युमन सायकॉलॉजी’चे कंगोरे समजवून सांगतांना, ‘जेन्डर डीस्क्रीमिनेशन’ वर तावातावाने बोलते तेव्हा एक वर्तुळ पूर्ण होतेय असा अत्यंत सार्थक भाव मनाचा कोपरा उजळतो!

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

बोधकरी...?


विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्
विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः ।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम्
विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशुः ॥

विद्या मनुष्याचे विशिष्ट रूप तथा विविक्षित गुप्तधन आहे.
विद्या मनुष्यास यश सुखाचा भोग घेण्यास पात्र बनविते म्हणून विद्या ही गुरूंची देखील गुरु आहे.
विदेशात विद्या मनुष्यास बंधू-सख्याप्रमाणे साथ देते म्हणून विद्या ही आद्य देवता आहे.
राजा-महाराजा देखील विद्येचीच पूजा करतात, धनाची नव्हे; विद्येशिवाय मनुष्य म्हणजे केवळ पशु होय.

आज विद्येबद्दलच्या अनेक संस्कृत वचनांमधील हेच वचन आठवण्याचे कारण म्हणजे त्यातील शेवटचा संदेश... अलीकडे माणसांतील पशुपण खूपच ठसठशीतपणे दृगोचर होत असलेले दिसते. आजचा मानव माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी थेट अश्मयुगात पोहचला की काय अशी शंका येते आणि मन विषण्णतेने भयग्रस्त तथा चिंतातूर होते. मनुष्यास नववर्षात विद्येसोबत विवेकाचे दान लाभो आणि ग्रहण सुटो ही प्रार्थना!

आज या श्लोकाचा अन्वयार्थ लावण्याचे निमित्त घडले ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील सभागृह! पुण्यातील अनेकविध परंपरा आणि संस्कृतीचे एक अभिजात प्रतीक म्हणजे नाट्यगृह, सभागृह आणि क्वचित ठिकाणी चित्रपटगृहात देखील शीर्षस्थानी ठळकपणे लिहिलेली सांस्कृतिक संस्कृत वचने... याच परंपरेचे पाईक म्हणून टिमविच्या सभागृहाच्या शीर्षस्थानी वरील वचनातील दुसरी ओळ लिहिलीय, परंतु कसे कुणास ठाऊक 'भोगकरी' च्या जागी 'बोधकरी' असे लिहिले आहे...? कुणास याबाबत अधिक तपशील माहित असल्यास खुलासा करावा...

बुधवार, ३ जानेवारी, २०१८

जाग...!

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही विदारक सामाजिक परिस्थिती, सुशिक्षित समाजाची संस्कारहीन वर्तणूक, 
'विकसित' देशाचे 'भारत' आणि 'इंडिया' हे सर्वमान्य विभाजन असे विचलीत करणारे वास्तव आणि 
समाजमन दुभंगण्याची साक्ष देणाऱ्या ताज्या घटना या पार्श्वभूमीवर; 
भारतातील शालेय शिक्षणाच्या आणि स्त्री मुक्तीच्या आद्य पुरस्कर्त्या, 
जाणीवजागृतीसाठी काव्यलेखन करणाऱ्या आणि सर्व स्तरावरील समस्त घटकांच्या तीव्र विरोधाची पर्वा न करता आपले कार्य अखंड चालू ठेवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रिबाई फुलेंचा आज १८७ वा जन्मदिन... 
त्यांच्या अलौकिक धैर्यास आणि अतुल्य कार्यास सादर समर्पित! 


कोण शुद्र कोण भद्र
माणूस पशुसम जगी,
व्यर्थ बलिदान सारे
विभागून द्वेष भोगी...!

नाही काही फरक जणू 
माणूस असो की तण,
एका काडीने येथे अन
वणवा पेटतो रणरण...!

संतांचे पुकार व्यर्थ होतील
आचरली ना जर शिकवण
नावातच भेद शोधता नित्य
पंथ उदंड वांझोटी वणवण...!

विवेक विचार वाढवावा
झेंडा हाती हाच गुन्हा,
मुर्दाड समाज भाळी
गुलामीच येईल पुन्हा...!

शिकल्या अडाणी जनांत
वैर भाव जागतो आहे,
इतिहास दोनशे वर्षांचा
आज जाग मागतो आहे...!

पुन्हा यावा शिवबा
मेली मने जागवाया
जन्मावी नवी सावित्री
माणूसपण शिकवाया...!

********

सावित्रीबाईंच्या स्मृतीस शतश: नमन...! त्यांचा असीम कर्तृत्वाचा हा अल्प परिचय...    

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

तुझ्या स्वागता...!


ज्येष्ठ कवयित्री शांताताई शेळके यांनी बरोब्बर २१ वर्षांपूर्वी आपल्या रोजनिशीच्या पानावर स्वहस्ताक्षरात केलेले नववर्षाचे स्वागत. कितीही काळ लोटला तरी या भावना जून न होता अधिकच परिपक्व आणि समर्पक भासतील!