शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

(अ)व्यवस्था...!


ही मला म्हणाली, ‘आपले पूर्वज आपल्यापेक्षा नक्कीच पुढारलेले होते!’
मी म्हणालो, ‘नि:संशय, उगाच का त्यांनी एवढे भव्यदिव्य निर्माण केले!’
ही म्हणाली, ‘आज एवढ्या आधुनिक तंत्रविज्ञानाने देखील ते का शक्य नाही?’
मी म्हणालो...

‘कारण तेव्हा विचार-आचार-व्यवहार यात शुद्धतेचा संस्कार होता.
समाजात काही व्यापारी होतेच पण व्यापाऱ्यांचाच समाज नव्हता...

प्रत्येक गोष्ट विक्रीला उपलब्ध नव्हती, काही कमवाव्याच लागायच्या आणि
ज्यांवर आपला अधिकार नाही त्या, मोह पडूनही, गमवाव्याच लागायच्या!

समग्र जगण्या-वागण्याची झाली व्यावसायिक वृत्ती नव्हती आणि
पदोपदी भेटणारी जाहिरात हीच एक अभि’व्यक्ती’ नव्हती.

लोक भेटायचे एकमेकांना कारणाशिवाय तसेच उदात्त हेतूंनीही
चर्चा घडायच्या चहासोबत आणि चहा शिवाय संवाद सेतूंनीही!

बुद्धी-प्रामाण्य-वादाच्या झडायच्या फैरी अन निघायचे काही ठराव सकल सृष्टी जगविण्याचे
'सृष्टी' संज्ञेत सारेच सामावयाचे, नव्हते विचार केवळ काही 'विशेष' मानव समूह तगविण्याचे!

सगळ्या राजकीय खेळींचा ‘बळी’ असला तरी शेतकरी औट घटकेचा का होईना ‘राजा’ होता
भ्रष्टाचार शिष्टाचार होण्याचा समाजमनावर व्रण नव्हता झाला, तो घाव अजून तसा ताजा होता!

आज विद्रोही कविताही वर्णनवादी शब्दबंबाळ पण उपाय शोधत नाही जाऊन मुळाशी खोल,
शिवारे भले जलयुक्त झाली असतील पण हरवत चालली माती धरून ठेवणारी मुळाची ओल!

अंतराळात उपग्रह सोडण्यापासून छोट्या देशांना मदत देण्याएवढा झाला आपला विकास आहे
वंचित मुले, भिकारी, बेघर, हताश शेतकरी अन बेरोजगार यांचे जगणे मात्र अजून भकास आहे!

समाजधारणेचे शुद्ध राजकारण होतांना धंद्यांच्या गणितात विकासाची गाडी नेहमीच फसते
आणि शांताबाईच्या शाळाबाह्य सोनूला व्हायरल होतांना पाहून अलेक्सा खळखळून हसते!'

एवढे प्रवचन ऐकून कंटाळलेली ही म्हणाली, ‘व्यवस्था बदलायची तर व्यवस्थेत राहून काम करा!’
मुंढेंच्या नव्याने पुनर्नियुक्तीची ताजी बातमी दाखवीत मी म्हणालो, ‘... आणि व्यवस्थेचे पाणी भरा?’

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

बाबा...!

मुरलीधर देविदास अर्थात बाबा आमटे यांची आज १०४ वी जयंती. 'आधुनिक भारताचे संत' असा सार्थ सन्मान लाभलेल्या बाबांचे कुष्ठरोग निर्मुलन, नर्मदा बचाओ आंदोलन तथा वन्यजीवन संरक्षण यातील अलौकिक कार्य अवघ्या जगाला ठाऊक आहे आणि हेमलकसा आणि आनंदवन येथे बाबांची चौथी पिढी या महान कार्याची पताका आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलते आहे. आज गुगलने देखील आपल्या डूडलच्या माध्यमातून बाबांना आदरांजली देत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे, त्याबद्दल गुगलचे अभिनंदन आणि आभार!



बाबांनी आपल्या कार्यात व्यस्त असतांनाच वाचन, लिखाण, भ्रमंती आणि विविध  प्रांतात जावून लोकांना भेटणे देखील सातत्याने सुरु ठेवले होते. यामुळेच अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील खलिस्तानवादी नंग्या तलवारी चमकवणाऱ्या शिखांच्या गराड्यातील निर्भय, निडर आणि अविचल बाबांच्या असामान्यत्वाचे किस्से अत्यंत नतमस्तक भावाने सांगू शकतात.

बाबांनी ज्या कविता केल्या त्यांचा संग्रह 'ज्वाला आणि फुले' अशा अत्यंत समर्पक नावाने प्रसिद्ध झाला आणि रसिकांची दादही मिळवून गेला. हा संपूर्ण संग्रहच केवळ वाचनीय आणि संग्रहणीयच नाही अक्षरश: प्रात:स्मरणीय आणि संपूर्णत: अनुकरणीय आहे. या संग्रहातील माझी सगळ्यात आवडती मुक्त छंदातील कविता आज बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ...

गांधी : एक युगाचा चेहरा
ज्यांच्या  नजरेला तो जगत असलेल्या शतकाची हिंस्त्र स्वप्ने कैद करू शकली नाहीत
आणि इतिहासाच्या दर्पणात ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा भावी पिढ्यांना दिसेल, असा.

गांधी: एक हिमनग
धृवभूमीवरून शितप्रवाहांच्या सोबतीने व उष्ण्वृत्तांच्या रोखाने निघालेला
ज्याचे प्रचंड प्राचीन सात अष्टमांश पाण्याखाली आणि जो फक्त एका ठेंगण्याश्या उंचवट्या इतका वर.

त्याने क्षितिजाशी डोके वर काढले तेव्हां अफाट समुद्रात वाट चुकल्यासारखे
बावळट वाटण्याइतपत साधे  सरळ त्याचे ध्यान होते.
तेव्हा पुष्कळांनी त्याच्याकडे गमतीने पाहून आपली करमणूक करून घेतली
पण त्याच तुच्छतेनं सर्व समुद्रावर राज्य करणाऱ्या जहाजांचा एक काफला जेव्हा त्याच्यावर चालून गेला
तेव्हां जगाने असे पाहिले की त्या हिमनगाच्या चेहेऱ्यावरचे बालिश हास्य ढळलेले नाही
आणि त्या लढाऊ जहाजांना जलसमाधी मिळालेली आहे.

गांधी: एक कलाकार,
देश एका कोऱ्या चित्रफलकासारखा त्याच्यासमोर होता.
आणि त्या रीत्या चौकटीने त्याला बैचैन केलं होते, आव्हानिले होते.
कुंचला घेतलेला त्याचा हात प्रारंभी काहीसा थरथरत होता
तो पेलण्याचा आत्मविश्वास अजून आलेला नव्हता.
चित्रफलकावर तो टेकवण्याचे साहस अजून होत नव्हते.
म्हणून रंगत बुडवून त्याने दुसरीकडे कोठे तरी काही फटकारे ओढले.
अखेर रंगांची एक संगती त्याने साधली त्यात दारिद्र्याचा मिट्ट काळा रंग होता,
श्वेत राजनीती आणि गुढ निळे अध्यात्मही होते.
नव-विचारांच्या अनेक रंगच्छटाही होत्या.
पन्नाशी गाठता गाठता त्याला आपली स्वतःची रेषा - व्हर्जिन लाईन ऑफ क्शन - गवसली
आतून उचंबळणारा आपला टोन त्याला सापडला
सर्व गृहीतांच्या सरहद्दी पुढे ढकलणारा हाही एक पॉप आर्टिस्ट होता.
चार तपांच्या तयारीने दोन तपांच्या आत त्याने ते चित्र पुरे केले. 
एका युगमुद्रेचे चित्र !

जे एका देशाच्या चित्रफलकात मावू शकत नाही.
ज्यात एकीकडे राजधानीतल्या विजयोन्मादाचा दिखाऊ दीपोत्सव आहे
आणि दुसरीकडे रक्तलांछित अंधारात -
(जेव्हा छायाही घाबरून मागे सुटलेली, तेव्हा )
विश्वासानं काठी टेकीत टेकीत
धानाच्या बांधावरून तोल सावरीत निघालेली
एका कोटीशीर्ष विराट पुरुषाची वाटचाल आहे-
आणि एक गरजणारी नि:शब्दता आहे.
एक जहाज: बंदर गाठण्याच्या बेतात असतानाच
किनाऱ्यापाशी येऊन फसलेले.
आणि बरगड्यांना साखळ्या बांधून तो ते ओढीत आहे
एकटाच !
खेचू शकला नाही तो हे रुतलेले जहाज.
खेचण्याच्या प्रयत्नांत उर फुटून कोसळला.
नव्हे!
जहाज ओढण्याच्या शक्तीलाच
तो ओढण्याचा प्रयत्न न समजलेल्या
एका मुर्ख आवेगाने डागले !
आणि आजही ते जहाज तेथे वाट पाहत पडले आहे 
कोणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रेन लावून
ते ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणी मुक्तीसेनेची वाट पाहत थांबले आहेत.
कोणी धर्मचक्र फिरवून या जहाजाचे चक्र 
फिरवण्याच्या प्रयत्नात आहेत.
कोणी ते कोळीष्टकातच फसले आहे असे समजून
अध्यात्माच्या हलक्या हातांनी ते काढू पाहताहेत.
हा गुंतावळा काढण्यासाठी ते जातात
आणि फक्त एक गोतावळा जमा करतात!
आणि सोडवण्याचे श्रेय कोणाला - म्हणून आधीच
आपसात भांडत सुटतात!!

स्वराज्यात जन्मलेली पिढीच
हे रुतलेले जहाज काढू शकणार आहे
आणि जे त्या पिढीला पकडू शकतील
तेच त्याचे खरे वारसदार ठरणार आहेत.

तप्त शलाकेसारखी ही पिढी कोण पकडील?
ती पकडण्यासाठी हवी असते अलिप्त यांत्रीकाची हिकमत!
ही हिकमत त्याच्यात होती.
त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला
आणि मग एक साम्राज्य
मिठाच्या सात समुद्रांपलीकडे फेकून दिले.
त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला.
याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि 
एक देशच्या देश बांधून दाखवला
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!
गांधी: ती हिकमत असलेला मानव
आणि ती ताकद असलेला प्रेषित
अखेर एक मानवच तर होता.
त्याने सामान्य मानवासारखे प्रमाद केले
पण सामान्य माणूस जे कबुल करीत नाही
ते त्याने जगजाहीर केले!
माणसाच्या आदिम समस्यांशी
त्यालाही धडक द्यावी लागली
मानवाच्या वास्तवतेचे रूप बुरखा काढून पाहण्याचा
त्यानेही प्रयत्न केला
आणि या प्रयत्नात पहिल्यांदा
खुद्द आपला बुरखा त्याने फाडून फेकला!

बरगड्या दिसणाऱ्या त्याच्या छातीवर दोन बिरुदे होती;
आणि एक नंगा फकीर असल्यामुळे ती बिरुदे त्याच्या मांसालाच चिकटली होती.
त्यापैकी एक होते वेदनेचेआणि दुसरे विश्वासाचे.
वेदना हा वर्तमानाचा स्वीकार होता विश्वास हे भविष्याचे आश्वासन होते.
अखेरपर्यंत वेदना आणि विश्वास या दोन किना-यातून 
त्या संतमानवाचा प्राणनद वाहत गेला.
पण त्याला तिसराही एक किनारा होता
शाश्वताचा!
आणि या तिसर्या किनार्याने प्रारंभापासून दिली होती
एक परिपक्वता!
ही परिपक्वता असली
तरच आपल्या प्रेषितत्वाचे ओझे वाटत नाही.
आणि चेहऱ्यावर कायम वसलेले असते
ते तसले शिशुचे हास्य!
जे प्रेषिताला माणसाच्या जवळ ठेवते.
तेव्हांच तो नेत्यांचा नेता
आणि जेत्यांचा विजेता होतो.

सामान्य माणसावर त्याचा असामान्य विश्वास असतो
सामान्य माणसातली असामान्य साहसे तो जागवतो
आहेत त्याच साधनातून तो आपल्या युद्धनौका घडवतो
आणि मिळतील त्याच माणसातून तो
त्यांच्या काफिल्याचे कप्तान आणि खलाशीही तयार करतो.
तो समाजसखा होऊन येतो.
मित्रभावाशिवाय दुसरी कोणतीही जादू त्याच्याजवळ नसते
म्हणून त्याच्या इतकी लगट
अज्ञान समाजाशी दुसरा कोणीही करू शकत नाही.

समाजमातेच्या  गर्भातून महान कल्पनेचे सुदृढ मुल
बाहेर पडायचे असते
तेव्हा तिची वीण उसवण्याचीही शक्यता असते.
अशा वेळी तिचे दायित्व करणारा तोच असतो
स्वरांच्या गोंधळातून गोंधळी एक लय तयार करतो
तसेच गर्दीच्या गोंधळातून
त्याचे आव्हान मंत्र उमटतात

हा संतमानव मरगळलेल्या जीवनात
वसंत फुलवीत येतो.
नेते आणि जेते हे त्याची कडू-गोड फळे
गोळा करणारे असतात.
ते भारती ओहोटीचे स्वार असतात
त्याचे स्थान मात्र भरती-ओहोटीत वाट दाखवणाऱ्या
धृवासारखे निश्चल असते.
समाज त्याच्या पालख्या घेऊन
शतकानुशतके नाचत सुटतो
जगज्जेत्यांच्या जन्मतिथ्या मात्र
शाळकरी पोरांकडून घोकंपट्टी करून लक्षात ठेवाव्या लागतात !

तुमच्या आमच्या जीवनातली शक्ती प्रतिक्रियेत खर्च होते.
त्याच्या जवळ विशुद्ध क्रिया असते.
म्हणून धबधब्यापेक्षा हजारपट मोठी
श्रावणझडीची उंची त्याला दिसते!
रोग्यात तो योगी पाहतो
आणि अस्पृश्यात त्याला हरिजन दिसतो.
आणि म्हणून तो कर्मकांडी राहू शकत नाही.
जीवनाचे संदर्भ तोडून कृतींचे अर्थ तो लावीत नाही.
गफारखानांच्या मुलासाठी तो मांसाहाराची व्यवस्था करतो 
हिंसक क्रतीकारांच्या धैर्याची तो पूजा करतो.
आणि प्रतिस्पर्ध्यांशीही वागताना त्याची मान ताठ
पण माथा झुकलेला असतो.
म्हणून त्याच्या उपवासाने
त्याला प्रतिस्पर्ध्याच्या हृदयात वास मिळतो
त्याची विशुद्ध क्रिया नसली
तर उपवासाचा उपहास होतो !
(बहुधा अशा उपवासांचा उपद्रवही होत असतो.)
त्याचा मंत्र जवळ नसला
म्हणजे त्याच्या यंत्रावर विणलेली खादी 
वैफल्याची नग्नता झाकू शकत नाही.
आणि त्याच्या तत्वांचे घटपट करत चालणारे 
बौद्धिक हस्तमैथुन
समाधानाचा फक्त भास देऊ शकते.
त्याने निर्मिती होत नाही.
विकृती मात्र निर्माण होते...

पण खांद्यावर जेव्हा क्रूस असतो
आणि डोक्याला कफन गुंडाळून जेव्हा जीवन निघालेले असते
तेव्हा त्याचा श्वासाश्वासात संकल्प असतात.
त्याच्या आचाराच्या पायाशी सिधी लोळण घेत येतात.
आणि त्याच्या विचारातून क्रांतीचा जन्म होत असतो.

आपली भूमिका संपली
म्हणजे दैदिप्यमान मृत्यूने आसमंत उजळीत
तो निघून जातो
पण बेचिराख झालेली त्याची राखही हसत असते
आणि तिच्यातून कित्येक किंग आणि ड्यूबचेक उठत असतात.
ज्याला तो क्रूस वागवता येतो
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले तरी त्याचे
प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कोणी बारा लाख बाजारबुणगे
घेऊन निघाला.
तरी त्याचा महंत होतो
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात
मन्वंतरे घडवू शकत नाहीत
(नव्या युगाचा चेहेरा कोणत्याही जुन्या साच्यात
घडवला जाऊ शकत नाही.)

गांधी महात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही.
आणि उद्याच्या पिढ्यांना त्याची ओळख पटण्यासाठी
क्वचित कॉम्प्यूटर लागेल !
पण काळाच्या भाळावर उमटलेली
ही तप्त युगमुद्रा
कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही !

- बाबा आमटे
(ज्वाला आणि फुले)

रविवार, १६ डिसेंबर, २०१८

अपराजित...?



त्या धनुर्धराला आपल्या धनुर्विद्येचा दुराभिमान होता. अनेक स्पर्धा जिंकत आणि अनेक धनुर्धरांना धूळ चारत तो एका गुरुकुलात पोहचला. आश्रमाच्या कुलगुरूंनी आपल्या पर्णकुटीत त्याचे यथोचित आदरातिथ्य केले आणि ख्यालीखुशाली विचारली. गुरूंच्या क्षमतेबद्दल अनभिज्ञ असलेल्या धनुर्धराने आपल्याच गुर्मीत आपल्या धनुर्विद्येची महती गर्विष्ठ भावाने गुरूंना सांगितली आणि त्यांनी स्वत: त्याच्या अलौकिक कौशल्याची प्रचीती घ्यावी म्हणून आग्रह धरला. ‘अतिथी देवो भव’ या संस्कृतीचे पाईक असलेल्या गुरूंनी त्याचा बालहट्ट पूर्ण करावा म्हणून त्याच्या कौशल्याचा नमुना बघायची तयारी दर्शवली.

धनुर्धराने आपले दोन्ही पाय जमिनीवर घट्ट रोवले, योग्य ती स्थिती घेतली आणि आकर्ण प्रत्यंचा ओढून एक बाण दूरवर झाडाच्या दिशेने सोडला. वायुवेगाने हवा कापीत तो बाण सरळ रेषेत झाडाच्या बुंध्यात मधोमध रुतला आणि धनुर्धराने विजयी मुद्रेने सभोवार नजर फिरवली. आश्रमातल्या विद्यार्थ्यांच्या नजरेतले कौतुक त्याला सुखावून गेले आणि आपल्या पुढील कृतीने त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा विस्मयचकित भाव पाहण्यासाठी तो अधीर झाला. त्याने दुसरा बाण प्रत्यंचेला लावला, नेम साधला आणि पुन्हा एकदा प्रत्यंचा आकर्ण ताणून बाण सोडला. या सणसणीत बाणाने झाडाच्या बुंध्यात रुतलेल्या बाणाचा मधोमध वेध घेवून, त्याच्या चिरफळ्या उडवीत त्याच्या जागी आपले टोक झाडाच्या बुंध्यात त्याच ठिकाणी रुतवले!

चोहोबाजूंनी युवा धनुर्धारंनी हर्षातिरेकाने चित्कार केले आणि धनुर्धराच्या या अतुलनीय कौशल्याने सारा आश्रम मंत्रमुग्ध झाला, भारावून गेला. जो तो ‘आपण आजवर असा श्रेष्ठ धनुर्धर कधी बघीतलाच नाही’ याचा निर्वाळा देवू लागला. या सर्वत्र कौतुकवर्षावाने मूळचा गर्विष्ठच असलेला तो धनुर्धर अधिकच मदमस्त झाला आणि त्याने सभोवार मग्रूर नजर फिरवीत विचारले, ‘आहे इथे कुणी असा धनुर्धर जो माझ्या या कौशल्याची बरोबरी करू शकेल, मला हरवू शकेल...?’ सर्व दर्शक स्तब्ध झाले, कुणालाच काही सुचेना. या सर्व घडामोडींचे मूक दर्शक असलेले आणि कुणाच्याच कुठल्याच कृतीने कणभरही विचलित न झालेले कुलगुरू आपल्या स्थानावरून उठले आणि त्यांनी धनुर्धराला आपल्या बरोबर चलण्याची खूण केली. आश्रमवासियांना चकित अवस्थेत सोडून धनुर्धर गुरूंच्या मागोमाग, थोड्या अपेक्षेने आणि बऱ्याचशा उत्सुकतेने, चालू लागला.

आश्रम मागे सोडून कुलगुरू डोंगराच्या दिशेने चालू लागले आणि धनुर्धर त्यांच्या मागे निघाला. डोंगरावर बऱ्याच उंचावर गेल्यावर त्याने बघितले की गुरु एका भल्या मोठ्या घळीपाशी थांबले आहेत जीची लांबी-रुंदी आणि खोली एखाद्या प्रवराइतकी भासते आहे. या खोल घळीच्या वर पलीकडे जाण्यासाठी एक अत्यंत जीर्णशीर्ण झालेला दोरीचा पूल बांधला आहे आणि हवेच्या हलक्याशा झोताने देखील तो पूल सर्व दिशांनी हिंदकळतो आहे, हेलकावे खातो आहे. गुरूंनी अत्यंत शांतपणे त्या अत्यंत धोकादायक भासणाऱ्या, वाऱ्याबरोबर भेलकांडणाऱ्या जर्जर अशा दोरीच्या पुलावर आपले पाय रोवले आहेत आणि क्षणार्धात ते स्थिर, निश्चल उभे आहेत. गुरूंनी एका संथ पण अखंड लयीत धनुष्य उंचावले, भात्यातून बाण काढून प्रत्यंचा ओढली, बाण लावला आणि डोळ्याचे पाते लवण्याच्या आत गुरूंच्या धनुष्यातून सुटलेला बाण वेगाने घोंगावणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह तप्त सुरीप्रमाणे कापीत दूरवरच्या झाडाच्या बुंध्यात मधोमध रुतला आहे आणि त्याच्या प्रवासाचा नाद वातावरणात गुंजतो आहे! पुलावरून सावकाश जमिनीवर परतलेल्या गुरूंनी धनुर्धराला म्हटले,
‘आता तुझी पाळी...’

आपण जे बघितले त्याच्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या धनुर्धाराने विस्फारित नजरेने आणि पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने जोरजोरात नकारार्थी मान हलवली आणि त्या घळीच्या खोलीने गर्भगळीत झालेल्या तरुण धनुर्धराच्या अवस्थेबद्दल सहानुभूती दर्शवत कुलगुरू अत्यंत सौम्य, स्निग्ध आणि निरहंकारी स्वरात म्हणाले,
‘मित्रा, धनुर्विद्येत तु निष्णात आहेस हे नि:संशय तथापि बाण सोडतांनाची एकाग्रता आणि दृढता ज्या मनोनिग्रहाने येते त्या चंचल मनावर अजून तुला बरेच काम करायचे आहे असे दिसते! हे धनुर्धरा, तुझ्या हिताची एक गोष्ट सांगतो ती लक्षपूर्वक ऐक – मनुष्यात जोवर जिज्ञासा, नम्रता आणि शिकण्याची वृत्ती शाबित असते तोवर त्याचा समग्र विकास होत असतो; तथापि ज्या क्षणी 'मी अजिंक्य, अभेद्य तथा सर्वश्रेष्ठ असल्याने अपराजित आहे' असा गर्व, असा दंभ उत्पन्न होतो ती त्याच्या विलयाची नांदी असते...! ’

[अस्वीकृती नव्हे, खुलासा – मला अत्यंत प्रिय असलेल्या झेन कथांमधील एका अतिशय मार्मिक आणि ‘भेदक’ अशा या बोधकथेचा, माझ्या प्रकटन मर्यादेत राहून मला जमला आणि भावला तसा हा मुक्त भावानुवाद असून मूळ कल्पनेचे श्रेय झेन सिद्धांताचेच आहे. आज मला पुन्हा एकदा रस्से सरांच्या ‘टिकटिक’मधील सुयश पटवर्धन यांच्या झेन संबंधीत ‘अनुभूती’च्या वर्णनाने हे लिहिण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा आभार आणि या बोधकथेचा कुठल्याही राजकीय, सामाजिक वर्तमानाशी किंवा सांप्रत शैक्षणिक अथवा संपादकीय घडामोडीशी दुरान्वयाने देखील संबंध नाही व तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!]

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

माती...!

आमचे जळगावचे स्नेही-सुहृद, शुभचिंतक परममित्र आणि प्रेरणास्थान 'टिकटिक'कार श्री. प्रदीप रस्से सर हे खरे गोताखोर रत्नपारखी आहेत. रोज सकाळी हा गृहस्थ कुठल्या जगात फेरफटका मारून येतो आणि त्याच्या 'सुभग विश्वाच्या' पदरात त्याने वेचलेली फुले, मौक्तिके, स्वर आणि गंध, कधी एकादशी देवीच्या सुबक आणि मोहक मूर्तीच्या माध्यमातून तर कधी स्वतःच टिपलेल्या एखाद्या बालिकेच्या तन्मय मुद्रेतून आणि एरवी त्याच्या, मेंदूला फार झिणझिण्या न आणता थेट हृदयाला भिडणाऱ्या शब्दातून टिकटिकत असतो. रस्से सरांच्या या अद्भुत नित्योपासनेने आम्ही अचंबित आणि प्रभावित आहोतच, तेवढे पुरेसे नाही म्हणून हे महाशय कधी कधी असे काही शोधून आणून पदरात घालतात की वाचणाऱ्यानेही 'दुबळी माझी झोळी' म्हणत लिहायला प्रवृत्त व्हावे. बाय द वे, 'प्रवृत्त करणे' आणि 'भडकावणे' यामध्ये 'भाविक' आणि 'भक्त' यात असतो तोच फरक आहे... तंतोतंत! हे आपले उगाच पॉलिटिकली करेक्ट असावे म्हणून... असो!

आज रस्से सरांनी 'रोज मिलिगन' या कवयित्रीची अभिजाततेच्या सर्व निकषांना पार करून दशांगुळे उरणारी अत्यंत दार्शनिक तथा विचक्षण कविता 'DUST IF YOU MUST' शेअर केली आणि तिची आशयघनता, हृदयस्पर्शी मांडणी आणि शाश्वत विचार मनाला इतका भावला की हा भाव मराठीत आलाच पाहिजे या उर्मीने, 'रोज'च्या अथवा रस्से सरांच्या परवानगीशिवायच, हा मुक्त भावानुवाद उमटला. मूळ कवयित्री बद्दल फारशी माहिती माहितीजालावर उपलब्ध नसली तरी ती जिथे असेल तिथे तिची क्षमा मागून आणि रस्से सरांचे अधिकच ऋणाईत होऊन हे क्षणभंगुर जीवनावरील अनुवादित भाष्य आपल्या सर्वांच्या जाणिवांसाठी सादर...


मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण येऊ दे काही आतुनही
रंगवता येते चित्र इंद्रधनुषी रंगाने नी करता येते हितगूज पत्रातुनही!
बनवता येतो साजूक तुपातला शिरा अन लावता येते बकुळीचे रोप
अपुऱ्या इच्छांमागे धावतांना का ओढवावा फुलत्या क्षणांचा कोप?

मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण वेळेचही ठेवा भान
चढायचेत डोंगर ओलांडून नद्या आणि ते पहा वाट पाहतेय रान!
गोंजारावे स्वर जे आले भेटी, भरून घ्यावे शब्दनाद श्वासातून
सजवावे जगणे मैत्रीच्या कोंदणात, उद्धारावे मानव्य ऱ्हासातून!

मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण जगण्याचीही ऐका साद
सूर्यबिंब उगवावे डोळ्यात कधी लागावा कधी भणाणऱ्या वाऱ्याचा नाद!
कवडसे उन्हाचे सुखविणारे, पाऊस देत सृजनाची ग्वाही
आला क्षण गेला क्षण हाच क्षण फिरुनी पुन्हा येणार नाही!

मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण हे देखील लक्षात ठेवा
संध्या छाया भिवविती हृदया हे प्राक्तन कुणालाच चुकत नाही देवा!
जन्माबरोबर प्रत्येकाचे सूर्य मावळण्याइतके निश्चित आहे जाणे
मातीच होईल आयुष्याची अन कापरासारखे उडून जाईल गाणे!




या निमित्ताने, पुण्यातील 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल'च्या प्रांगणात उभारलेला शिवाजी महाराजांचा ब्राँझमध्ये घडविलेला अश्वारूढ पुतळा घडविणारे आणि ‘एका पुतळ्याची आत्मकथा’ या आपल्या लेखात या पुतळ्याच्या जन्माची रंजक कहाणी सांगणारे महाराष्ट्राचे पद्मश्री शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर अर्थात नानासाहेब करमरकर यांचा एक किस्सा ऐकला होता, तो आठवला.

नानासाहेबांकडे एक ‘शिष्ट’मंडळ त्यांना हव्या असलेल्या कुठल्याशा पुतळ्याच्या कामासंबंधी बोलणी करण्यासाठी गेले. नानासाहेबांनी पुतळ्याच्या तपशिलाचा अदमास घेवून काही रक्कम शिल्प बनविण्याचे शुल्क म्हणून सांगितली. शिष्टमंडळातील एका ‘विशिष्ट’ व्यक्तीला ही रक्कम खूप जास्त वाटल्याने त्यांनी थोडी सखोल चौकशी करण्याच्या मिषाने नानासाहेबांना विचारले, ‘नेमके असे काय विशेष साहित्य अन वेळ लागणार आहे पुतळा बनवायला?’ त्यावर नानासाहेब उत्तरले, ‘बाकी साहित्य आणि माझ्या वेळेचे शंभरातले १० रुपये पण पुतळ्यासाठी लागणाऱ्या मातीचे शंभरातले ९० रुपये!’ जिज्ञासू म्हणाले, ‘अशी कुठली खास माती वापरणार आहात जिची किंमत ९०% आहे?’ पद्मश्री नानासाहेब सहजभावाने उद्गारले, ‘तीच जी मी आजवर माझ्या आयुष्याची केली...!’ पुढील तपशील ज्ञात नाही...

असो. हा मातीचा महिमा आज रस्से सरांच्या ‘टिकटिक’ आणि ‘रोज’ च्या ‘Dust if you must च्या निमित्ताने!

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

दुभंग...!


तेव्हा शाळांमध्ये शिक्षक होते पण मूल्य शिक्षणाचा तास नव्हता,
शिकून शहाणे होत विद्यार्थी अन शिकल्याचा फक्त भास नव्हता.
खडू-फळा, पाटी-पेन्सिल कलाभान शाळेचे अविभाज्य अंग होते,
मनोरंजन कृष्ण धवल असले तरी जगण्यात इंद्रधनुष्यी रंग होते.

सत्यमेव जयतेची जाहिरात नव्हती तो आचरणाचा भाग होता,
अनीती, लबाडी नी मतलबी दांभिकतेचा साऱ्यांनाच राग होता.
ओसंडून वाहणारा पैसा नव्हता पण जगण्याला सुभग अर्थ होता,
माणसे जपतांना क्षुद्र देवघेवीचा व्यावहारिक हिशोब व्यर्थ होता.

एकाच वर्तमानपत्रात सगळ्या वार्ता बातम्यांची मिळायची न्यूज,
दहा दैनिकांमधून कोसळायचे नाही बातमीशून्य अतिरेकी व्हयूज.
दूरदर्शन एकच एक होते जे रोज द्यायचे नेमके संकीर्ण समाचार,
कठपुतळ्यांच्या माध्यमातून चालत नसे चोवीस तास अनाचार.

तेव्हा घरांमध्ये माणसेच असायची
, झाले नव्हते त्यांचे कन्झ्युमर’,
विनोदबुद्धीही भद्र होती बोकाळला नव्हता ओंगाळवाणा हयुमर’.
अर्ध पुतळे मानवी होते, चौथरा आणि प्रेरणा दोन्ही होत्या भक्कम,
विक्रमी निर्माणांसाठी लागत नसे सामाजिक जबाबदारीची रक्कम.

साध्याभोळ्या सज्जनांचा देव सोन्याच्या पिंजऱ्यात बंदी नव्हता
,
भाबडा सत्वशील भक्तही देवाचा असा रगेल, छंदी फंदी नव्हता.
राम जन्मायचा दर वर्षी आणि कथेतून भोगायचा निमूट वनवास,
अज्ञातवासात राहून प्रकटायचा नाही, येताच निवडणुकीचा वास.

स्वर-रंग-गंध मुक्त आणि भाव सहज तथा परवडण्यासारखे होते
,
जात-धर्म-लिंग विषमता हे तर मानव्यच खरवडण्यासारखे होते.
साध्या साध्या बोलण्यालाही टोकदार तात्विक अभिनिवेश नव्हता,
विद्यार्थी आणि शासकीय सेवकांशिवाय कुणालाही गणवेश नव्हता.

तेव्हा माणसे एकमेकास चक्क भेटायची अन बोलायची भीड नव्हती,
कनेक्टेड फील करण्यासाठी स्मार्टफोन अन फेसबुकची नीड नव्हती.
ज्ञान वसे चर्चा, पुस्तके, ग्रंथातून आणि माहितीतही होता इनोसंस,
व्हॉट्सअॅप विद्यापीठ अजून व्हायचे होते 'इंस्टीट्युट ऑफ इमिनंस'.

चिंता असतील पण नव्हती भिती, आतला आवाज जागा होता,
सर्व लोकांना जोडणारा सुखदु:खाचा एकच समान धागा होता.
घरे छोटी आणि खोल्या लहान, दिखाव्याला पण नव्हती स्पेस,
अवघ्या जगण्याचीच झाली नव्हती निर्बुद्धजीवघेणी रॅट रेस.

चरितार्थ, उदरनिर्वाह, उपजीविका इतके काही कनसाईज नव्हते,
पॅकेज’, ‘डील’, ‘इएमआयसाठी वाट्टेल तसे कॉमप्रोमाईज नव्हते.
जगण्यामध्ये लाख उणीवा असतील पण समाधान काठोकाठ होते,
आत्मग्रस्त विकासाच्या हव्यासाने विग्रहाची वाढ पाठोपाठ होते.

मनोरंजनात देखील मूल्ये होती झाला नव्हता त्याचाही बाजार
,
शरीर निरोगी ठेवण्यासाठी धडपड आणि मनाला लाख आजार.
आज दुनिया मुठ्ठीमेआणि स्वच्छंद विहारास खुला आसमां है’,
पण किती लोक बाणेदारपणे म्हणू शकतात मेरे पास मां है’...?

घरं आज काठोकाठ भरलीयत दिखाव्याच्या सर्व साधन सुविधांनी
,
मनं असेनात का एकलकोंडी आणि भयग्रस्त अविश्वास, दुविधांनी.
भोगवादी जगण्यात असल्या नाही शिल्लक कुठेही अभंगाचा अंश,
अशा 'नवश्रीमंती' समृद्धीला म्हणूनच छळतो नित्य दुभंगाचा दंश!

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

बाल्य...!


लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
बालपणीचा काळ रम्य
सगळ्यांना पुन्हा हवा!

तुका म्हणे बरवे जाण
व्हावे लहानाहूनी लहान
झाले मोठे, मिळवले जग
तरी कशी भागेना तहान!

जया अंगी 'मोठे'पण
तया यातना कठीण
निरागस बाल्याचे सर्वां
मिळावे मूल्य शिक्षण!

बालदिनाच्या चिमुकल्या शुभेच्छा!

शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८

नमन...!

मशाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याची
परिवर्तनाचा ती झंझावात होती
लढण्याचा वसा देऊन रंगभूमीस
शांत झाली एक ओजस्वी ज्योती...!


रंगमंच आणि नाटक या माध्यमाला एक नवीन परिमाण देऊन समृद्ध करणाऱ्या आणि त्याची किंमत मोजणाऱ्या
धाडसी, करारी ज्येष्ठ रंगकर्मी लालन सारंग यांच्या स्मृतीस सादर नमन!

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

आनंदयात्री...!


‘पु. ल. देशपांडे हे मराठी सारस्वताला पडलेलं स्वप्न होतं आणि शारदेच्या मंदिरातील तो रत्नजडीत हस्तिदंती स्तंभ आहे...’ अशा सखाराम गटणेच्या भाषेत पुलंच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ करावा असा अस्फुट विचार मनात आला होता पण खुद्द पुलंनीच या वाक्याची किती आणि कशी टिंगल केली असती या कल्पनेनं हसू फुटलं! शिवाय काल पहाटे ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण ते बालगंधर्व व्हाया ‘आशय’चा ग्लोबल असा ‘पुलोत्सव’ साजरा होत असतांना पुलंबद्दल जे जे बोललं गेलं (आणि ऐकाव लागलं), दाखवलं गेलं (आणि पहावं लागलं) तथा साकारलं गेलं (आणि भोगावं लागलं) त्या अत्यंत समृद्ध, सुभग सांस्कृतिक अनुभवाला छेद नको म्हणून ‘त्या’ वि. स. प्रेरित गोळीबंद वाक्याचा मोह टाळला आणि मराठी रत्नमाला एका मौक्तिकाला मुकली!

‘कालच्या ‘पुल’कित दिवसात पुलंच्या वि’पुल’ व्यक्तिमत्वाने साजरा झालेला ‘पुलो’त्सव एका पुरुषोत्तमाचा मना-मनांमध्ये ‘पूल’ बांधण्याच्या अट्टाहासाचा प्रवास होता...’ हे नानू सरंजामे छाप वाक्यही पुलंना फारसं मानवलं नसतंच पण तसा स्टार्ट घेतल्याशिवाय लाईन आणि लेंग्थ हवी तशी सांभाळता येणार नाही म्हणून हा रन-अप. पुल हे व्यक्ती आणखीन वल्ली म्हणून इतके अफाट आणि अथांग होते, आहेत की एक संपूर्ण दिवस आणि चार कार्यक्रम हे फारतर या अवलियाचा अल्प परिचय करून देऊ शकतात, त्यांच्या समग्र कार्याचा समर्पक आढावा नाही घेऊ शकत!


कथा लेखन-सादरीकरण, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, ललित, स्फुटं, वैचारिक तथा सामाजिक लेखन, चित्रपट कथा-पटकथा-लेखन-दिग्दर्शन-संगीत आणि आविष्काराची एवढी साधने पुरेशी नाहीत म्हणून की काय सभा आणि मंच गाजविणारे वक्तृत्व अशा शब्दश: हरहुन्नरी आणि बहुमुखी, बहुश्रुत प्रतिभेने आयुष्यात जे जे म्हणून साकारले ते ‘अभिजात’ या प्रकारात मोडणारे होते याची साक्ष पुलंच्या लोकप्रिय पुस्तकांच्या अर्धशतकी आवृत्या, मराठीतील ‘बेस्ट-सेलर’ हा बहुमान आणि दिवसेंदिवस वाढतच जाणार ‘पुलं’ नावाचं गारुड, हे सगळे एका प्रकटनात बसविणे फक्त कठीण नाही तर अशक्य आहे!

‘ते ‘सदू आणि दादू’ बरोबर थोडं ‘नारू आणि पारु’ही लिव्हलं तर कवितेच यमकही जुळतंय की हो म्हणतो मी...’ असा प्रतिभावान सल्ला देणाऱ्या रावसाहेबांमुळे, चाळीतल्या परोपकारी गंपूमुळे, चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपलांमुळे आणि घरोघरी लग्नकार्यात भटजीपासून शेटजीपर्यंत सगळ्याची व्यवस्था पाहणाऱ्या नारायणामुळे पुलंचे बहुतेक पैलू हे चिरपरिचित असले आणि पुस्तके, मासिके तसेच दृकश्राव्य माध्यमातून (अगदी यूट्युबवरही) उपलब्ध असले तरी पुलंचा फारसा प्रकाशात आणि (प्रकाशनात) न आलेला चेहरा हा एका मार्मिक कवी आणि विचक्षण दार्शनिकाचा देखील आहे असे आमचे प्रांजळ आणि परखड(?) मत आहे! हो, अप्पा प्रधानाप्रमाणे आमचे कायस्थ रक्त आणि आईकडूनच काय कुणाकडूनही खंडो बल्लाळाशी नातं नसलं म्हणून काय, '...कवणे बाणेदार असूच नये की काय...?'


तेंव्हा पुलंमधला फारसा परिचित नसलेला कवि-भाष्यकार या निमित्ताने सादर करावा म्हणून दोन व्हिडीओज् – एक अफलातून कविता आणि एक जीवनदर्शन! पुलंबद्दल आमची लेखनसीमा म्हणजे ‘...परी या सम हा!’ आणि ‘तुझिया जातीचा मिळो आम्हां कोणी’ – हो, पुलंबद्दल काव्यात्म लिहिणे येरागबाळ्याचे काम नोहे, ‘तेथे पाहिजे जातीचे...’ म्हणजे कसे तर पुलंबद्दल त्यांचे स्नेही, सन्मित्र मंगेश पाडगांवकर म्हणाले...

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली
निराशेतुनी माणसे मुक्त झाली
जगू लागली, हास्य गंगेत न्हाली!

आणि ‘बाकीबाब’ बा. भ. बोरकर म्हणाले... 

जराशप्त या येथल्या जीवनाला I कलायौवने तूच उ:शापिले I
यथातप्त जीवी स्मिते पेरुनी तू I निराशेत आशेस शृंगारिले I
मिलाफुन कल्याणकारुण्य हास्यी I तुवां स्थापिला स्वर्ग या भूतली I
तुझ्यासारखा तूच आनंदयात्री I तुवां फेडिली गाठ प्राणातली I

आणि खुद्द कविवर्य पु. ल. देशपांडेंच्या काही धाडसी कविता...

१. 
एकदा तुम्ही मला
छान दिसतेस म्हणालांत
पण 'समोरच्या सरोजबाईसारखी'
हे शब्द जोडून...

२. 
बहात्तर कादंबऱ्या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या
दम्याने पंचाहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा 'सुटली' म्हणायच्या ऐवजी
तुम्ही 'सुटलो' म्हणालात...

३.
माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी
परवा मला म्हणाली,
'मला चांगलेसे स्थळ शोधून द्या ना-
इथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय' 

४. 
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत
चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा

सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

‘पात्र’...!


सत्वशील एकवचनी राम सांगे
महाल नको पर्णकुटी बांधाव्या
भक्त म्हणे मर्यादा पुरुषोत्तम
चला, त्याचा पुतळा उभारू या...!

बुद्ध म्हणाला अप्प दीपो भव:
तूच हो दीप मार्गास तुझिया
ते म्हणाले बुद्ध देवहोता
त्याचा पुतळा उभारू या...!

राजे वदले स्वराज्य घडवू
सारे एक होऊनी लढू या
ते म्हणाले जाणता राजा
त्याचा पुतळा उभारू या...!

फुले म्हणे टाकुनी गुलामगिरी
शिका उत्क्रांतीच्या पातळ्या
ते म्हणाले हा तर महात्मा
त्याचा पुतळा उभारू या...!

टिळक गरजले, स्वराज्य हा
जन्मसिद्ध हक्क मिळवू या
ते म्हणाले हे लोकमान्य
त्यांचा पुतळा उभारू या...!

गांधी विनवती सत्याचरणाने
स्वावलंबनाची कास धरू या
ते म्हणाले अरे, हा तर संत
याचा पुतळा उभारू या...!

आंबेडकर म्हणती सर्वांनाच हवे
स्वातंत्र्य, समता, बंधुता जगाया
ते म्हणाले हा खरा शिल्पकार
याचाही पुतळा उभारू या...!

सरदार होते मौन जाणीवेने
राष्ट्रधर्मास जागून आपल्या
ते म्हणाले हा तर उपेक्षित
याचा भव्य पुतळा उभारू या...!

----------------------------------------------------------

रात्री सारेच पुतळे पुसती एकमेकास
याच साठी का केला होता अट्टाहास?
'भारत' कुठे ज्यासाठी भोगला कारावास?
'इंडिया'मध्ये आपण उरलो फक्त इतिहास?

कर्ण असहाय्य म्हणून अर्जुन दिग्विजयी,
शुक्राचार्य धर्माचरणी अन अधर्मी द्रोण?
सामाजिक जबाबदारीही कुणाची नी
ती निभाविण्यास पात्रठरते कसे कोण...?

कुणाचे भक्तहे अन अनुयायीकुणाचे
'हारघालता पुतळ्यास ती विचारांची होते
आपल्या मार्गाने चालण्याहून हार घालणे सोपे
कठपुतळ्यांना कसे कळावे अंती हार त्यांचीच होते!

----------------------------------------------------------

टीकाकार रामदासाने नवीन वात्रटिका फाडली
'खुजेपणा लपविण्यासाठी नामी युक्ती काढली
नेत्यांची कमी होताच पुतळ्यांची उंची वाढली...'
भक्त म्हणती, 'पहा, याने पुन्हा खोडी काढली...!'

-------------------------------------------------------------