मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

प्राक्तन...?


निर्माल्य हाती फुलांचे 
तळवे सुगंधात न्हाले
सुकण्यातच त्या अन्
जगणे फुलून आले...!

मनास यातना नित्य
व्यथांचे मनोरे झाले
शल्य मनीचे तरीही
ओठी कधी न आले...!

योध्यास न तमा येथ
शर रूतो की भाले
जिंकण्यातही सदा
हरणेच हाती आले...!

पाण्यास शाप वाहण्याचा
ओढे असो वा नाले
साचण्याच्या नशिबी
नाव डबकेच आले...!

हा खेळ प्राक्तनाचा
शर्थ वांझोटी चाले
वेड्या मुसाफिराच्या
वाट्यास द्वंद्व आले...!

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

'मेरे पास माँ हैं...!'


आमची जडण घडण ज्या चार घटकांवर झाली त्यातले पहिले होते आमचे कुटुंब, स्नेही, मित्रपरिवार - म्हणजे रूढार्थाने समाज, दुसरी होती शाळा - म्हणजे शिक्षण, तिसरे होते वाचन, लिखाण - म्हणजे साहित्य आणि शेवटचे चवथे पण अतिशय महत्वाचे आणि आत्यंतिक आवडीचे म्हणजे नाटक - सिनेमा! त्यातही, सोईस्कर, किफायतशीर आणि भव्य-दिव्य यासह इतर अनेक व्यावहारिक कारणांसाठी सिनेमा अधिक प्रिय आणि जवळचा! ६५ पैसे तिकिटावर आम्ही समोरच्या पडद्याला नाक लावून, मान उंचावून सिनेमा बघितला आहे हे आता कुणाला खरे देखील वाटणार नाही. आमच्या काळात 'मूल्य शिक्षणा'ची टूम निघाली नाही त्याचे कारण या सगळ्या घटकांच्या एकत्रित अस्तित्वाने आमचे 'मूल्य शिक्षण' अत्यंत सापेक्षभावाने अष्टौप्रहर चाललेले असे. 

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे शशी कपूर यांचे निधन! अमिताभने आम्हाला व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध उभे रहायला आणि निर्भीडपणे लढायला शिकविले तर शशी कपूर यांनी आम्हाला, 'हमारे खयालात कितने मिलते है...' म्हणत लोभसवाणे फ्लर्टींग करत 'मोहोब्बत बडे कामकी चीज है...' हे तर शिकवलेच पण त्याबरोबरच खाण कामगारांच्या हक्कासाठी इंजिनियरच्या नोकरीत असून खाण मालकाशी लढायला शिकवले आणि सांस्कृतिक अभिजातता म्हणजे काय याचा सर्वोत्तम नमुना 'उत्सव'च्या रूपाने सादर केला. 

हे सगळे असले तरी, आमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा, आयुष्याकडे बघण्याच्या परिप्रेक्ष्याचा आणि एकूणच अस्तित्वाचा डोलारा ज्या प्रसंगावर आणि डॉयलॉग वर उभा राहीला तो होता... 'मेरे पास माँ हैं...!' आमच्या हृदयांचा अनभिषिक्त शहेनशहा असलेला अमिताभ या प्रसंगात खजील आणि निरुत्तर होत असला तरी आम्हाला हा प्रसंग त्याच्या, ...'मैं आजभी फेके हुए पैसे नही उठाता...' इतकाच प्रभावशाली आणि प्रेरणादायक ठरत आलेला आहे, आणि हे कसब जेवढे लेखक-दिग्दर्शक यांचे आहे तेवढेच, तो खुद्दार प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्ष करारीपणा, संयमी दृढनिश्चय आणि नीतिमत्ता सांभाळणारे चारित्र्य, केवळ चार शब्दांच्या एका डॉयलॉग डिलिव्हरीतून व्यक्त करू शकणाऱ्या शशी कपूर यांचे आहे. आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून एवढेच म्हणावेसे वाटते... 'हमारे पास आपके दिये हुए आदर्श है...!'

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

शुभास्ते पंथानः संतु...!

विंदांच्या जन्मशताब्दी निमित्त सुरु केलेल्या 'रोज एक कविता'मधील आज ही १०० वी कविता! विविध कारणांस्तव, ३६५ कवितांचे लक्ष्य पूर्ण होईलसे वाटत नाही; तथापि विंदांच्या अत्यंत लोकप्रिय तथा अजरामर अशा कविता ज्यांना अजून इथे स्थान मिळालेले नाही त्यासाठी मनात काही योजना आहे. तेंव्हा विंदांच्या उत्कट काव्यप्रतिभेचे अजून काही नमुने रसिकांना इथे रसग्रहणासाठी जरूर मिळतील. शिवाय, आजवर इथे प्रकट न झालेली आणि आपल्याला माहीत असलेली विंदांची कुठलीही रचना अथवा स्त्रोत आपल्याला माहीत असल्यास खाली प्रतिक्रियेत जरूर लिहावा. पडताळणीअंती तो ऐवज वैध ठरल्यास, प्रेषकाला यथोचित श्रेय देवून, त्यास इथे प्रसिद्धी मिळेल. 

आजच्या मुहूर्तावर शतकी कविता... 


...पुतळा... 



माझ्याच उंचीचा एक पुतळा, 
माझेच नाक,
माझेच डोळे,
आणि छाताड पुढे झुकवण्याची पद्धतही माझीच.

त्या तोतयाला मी माझे कपडे चढवले.
पॅण्टची बटणे लावली, 
डोक्यावर टोपी ठेवली.
हातामध्ये काठी दिली.
आणि मग जोडासुद्धा त्याच्या पायापुढे नीट मांडून 
मी सर्वस्वी विधीमुक्त झालो. हसलो. 

माझा जोड पायात घालून तो झपाझप निघून गेला.

शेवटी अटळ ते करावेच लागते :
त्याच्या चबुतऱ्यावर मी मख्खपणे उभा राहिलो.

----------------

गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०१७ साठी कविता...

...शाप...


सर्व जगाला जिंकुन नंतर
मदन लागला जिंकाया शिव;
शाप शिवानें दिधला त्याला
“विजयामध्यें तुझा पराभव”.

----------------

बुधवार, दि. २९ नोव्हेंबर २०१७ साठी कविता...

...क्षण... 


क्षणांत आहे अद्भुत शक्ति
आकुंचित–प्रसृत होण्याची;
‘आदि’ला हाणुनियां लाथा
‘अंता’ला ठोसा देण्याची.