मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

ज्ञान गुन सागर...!


न बले विद्यते तुल्यो न गतौ न मतौ परः

बल, बुद्धि आणि गतिमध्ये वानरवीर, कपिश्रेष्ठ हनुमंताची बरोबरी करणारा दुसरा कुणीही नाही. 

प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करून आपल्या प्राणप्रिय सीतेस त्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी समुद्राच्या दक्षिण तटावर पोहचले. अशोकवनात शोकमग्न सीतेला आपल्या आगमनाची सूचना व लवकरच तिच्या होणाऱ्या मुक्तीचा व राम-सीता पुनर्मिलनाचा दिलासा देण्यास कुणास धाडावे असा प्रश्न त्यांना पडला. दक्षिण तटापासून लंकेची भूमी शंभर योजने दूर. एवढे अंतर एका दमात लांघून जाण्यायोग्य कोण वीर आपल्या सेनेत आहे या विचारात प्रभू असतांना वानर योध्यांनी वेगवेगळ्या योजने उड्डाणांचे दावे केले पण ते शंभराच्या जवळपासही पोहचणारे नव्हते. अशा अत्यंत नाजूक वेळी हनुमंत मात्र काहीही न बोलता एका शिळेवर चिंतातूर बसलेला पाहून प्रभू रामास मोठा विस्मय झाला आणि त्यांनी जांबुवंताकडे पृच्छा केली. तेव्हां जांबुवंत म्हणाले, ‘हे प्रभो, या सर्वशक्तीशाली आणि महाप्रतापी अशा वानरसेनेचा सेनापती होण्याची योग्यता आणि शंभर योजने उड्डाणाचे सामर्थ्य केवळ हनुमंताकडे आहे परंतु त्याला बालपणी मिळालेल्या शापाने त्यास आपल्या सामर्थ्यांचा विसर पडला आहे. त्याला त्याच्या सामर्थ्यांचे स्मरण करून देताच तो उड्डाणास सिद्ध तर होईलच शिवाय त्याचे सामर्थ्य कलाकलाने वाढू लागेल!’

असा कोणता शाप हनुमंताला भोगावा लागला आणि का?

मारुतीच्या शैशवात एके सकाळी माता अंजनी आपल्या वायुपुत्रासाठी फळे आणण्यासाठी वनात गेली असता थोडी दूर निघून गेल्याने, मातृवियोग आणि भूक याने कासावीस झालेला बाल हनुमान उघड्या अंगणात आला आणि उगवत्या सूर्याला पाहून त्याला या गरगरीत लालचुटुक फळाचा फारच मोह पडला. हे फळ निश्चितच मधुर असणार या विचाराने तो त्याच्या दिशेने आकाशात झेपावला. एवढे छोटेसे बालक सहस्त्रावधी योजने उड्डाण करतांना पाहून या दैवी बालकास कुणीतरी रोखावे म्हणून सगळ्यांनी इंद्राचा धावा केला. इंद्र वायुपुत्राची वाट अडवेपर्यंत बच्चमजी सूर्यापर्यंत फक्त पोहचलेच नव्हते तर त्यांनी तो तेजोनिधी लोहगोल गट्टम केला होता! सूर्याच्या तेजाने सुफलित झालेली पृथ्वी आणि प्रदिपित झालेले आकाश या सगळ्यावर अंध:कार दाटला आणि हाहा:कार माजला. काळ जणू थांबला! आता निरुपाय झाला म्हणून इंद्राने बाल हनुमानाच्या डोक्यावर वज्राने प्रहार केला आणि त्याच्या मुखातून गगनराज भास्कराची सुटका झाली. परंतु चक्क दिनमणी व्योमराज मुखात ठेवल्याने बाल हनुमंताचे दोन्ही गाल लालबुंद होवून टम्म सुजले ते कायमचे आणि त्या वज्राघाताने तो तात्काळ मूर्च्छित झाला.

सूर्याच्या दिशेने आपल्या पराक्रमी पुत्रास उडतांना पाहून पवन राजाने त्याच्या रक्षणासाठी त्याच्या मागे धाव घेवून, सूर्याच्या तेजाने तो करपू नये म्हणून अतिशय शीतल हिमरूप धारण केले होते. आपला पुत्र मूर्च्छित झालेला पाहताच वायू भयंकर कोपित झाला आणि आपल्या पुत्रासह एका गुहेत जावून बसला. वायुने आपले कार्य थांबविल्याने सर्व चराचर सृष्टी आणि प्राणीमात्रांचे प्राण कंठाशी आले आणि आता सर्व काही संपणार अशी परिस्थिती दिसू लागली. वायुराजाची मनधरणी करून त्याचा राग शांत व्हावा व सृष्टीचे कार्य पुन्हा सुरळीत व्हावे म्हणून देवादिकांनी ब्रह्माची आळवणी केली. स्वत: ब्रह्मदेव देवता, गंधर्व, नाग आणि गुह्यक आदि प्रजांना बरोबर घेऊन गेले. तेथे त्यांना वायुदेवाच्या मांडीवर सूर्य, अग्नी, सुवर्ण यांच्याप्रमाणे अंगकांती असणारे हनुमान दिसले. ब्रह्मदेवाला दया आली. त्याने त्या शिशुच्या अंगवरूनही हात फिरवला. ब्रह्मदेवांच्या हाताचा लीलापूर्वक स्पर्श होताच शिशु हनुमान जागे झाले. बालक जिवंत झालेले पहाताच वायुदेव प्रसन्न झाले. ते चराचरात पूर्ववत संचार करु लागले. या बालकाच्या द्वारा भविष्य़ात देवांचीच बरीच कार्ये सिद्धीस जाणार होती हे ओळखून ब्रह्मदेवांनी तेथे आलेल्या सार्‍या देवतांना त्या बालकाला वर देण्यास सांगितले.

इंद्राने वर दिला की हा आपल्या वज्राने सुद्धा मारला जाणार नाही. सूर्याने त्यांना आपल्या तेजाचा शंभरावा भाग तर दिलाच पण असेही सांगितले की आपणच या बालकाला शास्त्रज्ञान देऊ की ज्यामुळे य़ा बालकाची शास्त्रज्ञानात कोणीही बरोबरी करू शकणार नाही व हा उत्तम वक्ता होईल. आपल्या पाशाने या बालकाचा मृत्यु होणार नाही असा वरुणाने वर दिला. आपल्या दंडाने हा अवध्य व निरोगी होईल असा यमाने वर दिला. आपल्या गदेने हा कधी युद्धात ठार मारला जाणार नाही व याला युद्धात कधी विषाद होणार नाही असा वर कुबेराने दिला. शंकरांच्या आयुधांनी हा मारला जाणार नाही असा शंकराने वर दिला. विश्वकर्मा म्हणाला की आपण जेवढी दिव्य अस्त्रे बनवली आहेत, त्यांच्यापासून अवध्य होऊन हा बालक चिरंजीवी होईल. हा दीर्घायु, महात्मा तसेच सर्व प्रकारच्या ब्रह्मदण्डांपासून अवध्य होईल असा वर देऊन ब्रह्मदेव वायूला म्हणाले, “मारुत ! तुमचा हा पुत्र मारुति शत्रुसाठी भयंकर आणि मित्रांसाठी अभयदाता होईल. युद्धात कोणीही याला जिंकू शकणार नाही. हा इच्छेनुसार रूप धारण करू शकेल, जेथे इच्छा असेल तेथे जाऊ शकेल, याची गति याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तीव्र अथवा मंद होईल तसेच ती कुठेही अडणार नाही. हा कपिश्रेष्ठ अत्यंत यशस्वी होईल. हा युद्धस्थळी रावणाचा संहार आणि भगवान्‌ श्रीरामचंद्रांची प्रसन्नता संपादन करण्यासाठी अनेक अद्‌भुत तसेच रोमांचकारी कर्मे करील”.

सामर्थ्य प्राप्त झाले की मग ते शारीरिक असो वा आर्थिक असो त्यामुळे प्राणी उन्मत्त होतो. हनुमानही याला अपवाद ठरले नाहीत. वर मिळल्यामुळे हनुमान निर्भय होऊन महर्षिंच्या आश्रमांत परत परत जाऊन उपद्रव करीत होते. हे शान्तचित्त महात्म्यांची यज्ञोपयोगी पात्रे फोडून टाकत असत, अग्निहोत्राचे साधनभूत स्त्रुक, स्त्रुवा आदि तोडून टाकीत आणि ढीगावर ठेवल्या गेलेल्या वल्कलांना चिरून, फाडून टाकीत असत. ते अवध्य असल्यामुळे सर्व ऋषीही विवश होऊन त्यांचा हा उपद्रव सहन करत होते. वायूने या आपल्या बालकाला वारंवार समजावले. पण हनुमानांचे उपद्रव देणे थांबले नाही. तेव्हा भृगु व अंगिरांच्या कुळात जन्मास आलेल्या ऋषींनी यांना शाप दिला की, “वानरवीरा ! तू ज्या बळाचा आश्रय घेऊन आम्हाला कष्ट देत आहेस त्याचा आमच्या शापाने मोहित होऊन तुला दीर्घकाळपर्यंत विसर पडेल. तुला स्वतःच्या बळाचा पत्ताच लागणार नाही. जेव्हा कोणी तुला तुझ्या कीर्तीचे स्मरण करून देईल, तेव्हा तुझे बळ वाढेल.” तेव्हा त्यांना आपल्या बळाचे विस्मरण झाले व ते मृदुल प्रकृतिचे होऊन विचरण करू लागले. अर्थात जरी ते आपल्या बळाने गर्विष्ठ झाले होते तरी त्यांचा उपद्रव हा खट्याळ बालकाला शोभणारा होता, म्हणून ऋषींनी त्यांना दिलेला शाप अतिशय सौम्य स्वरूपाचा होता.

अशी कथा वाल्मिकी रामायणातील उत्तराकांडात येते.

प्रत्येक माणसालाही काही एक सामर्थ्याचा वर जरूर मिळालेला असतो पण आपल्याच विकार-आवेगांच्या मस्तीत जीवास त्याचा विसर पडतो. योग्य स्थळी, योग्य वेळी, योग्य महानुभावाच्या माध्यमातून आपल्यातील या क्षमतेचे भान आल्यास आपल्या जीवितकार्याची जाण साधारण मानवास देखील होवू शकते. चिरंजीव हनुमंताची पात्रता मर्त्य मानवाच्या अंगी नसल्याने, प्रभू रामचंद्राच्या कृपेने जांबुवंतासारखा 'जागल्या' त्याच्या नशिबी नसला आणि कुणास गुरु करण्याचा विनय देखील आपल्याच मस्तीत जगणारा मनुष्य दाखवू शकत नसला, तरी एक गोष्ट जन्मत:च सगळ्याच मनुष्यप्राण्यांना निसर्गाने बहाल केलेली आहे, त्याच मानवी वैशिष्ट्याला आपण आपला वाटाड्या बनवू शकलो तर आजच्या जगातील बऱ्याचशा समस्या चुटकीसरशी सुटतील. त्या आपल्या अंतरी सदोदित वास करणाऱ्या पथदर्शकाचे नाव... विवेक! आणि त्यास सहवेदनेची जोड मिळाल्यास मनुष्यत्व शंभरच काय सहस्त्र योजने देखील झेप घेवू शकेल...

बघा पटतंय का... आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर, सहवेदनेच्या भावाने आणि विवेकाच्या साथीने, घेऊ या शोध आपल्यातील सुप्त क्षमतांचा...?

शुभम भवतु !