शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

नांदी तेजोत्सवाची...!


तेजाचा तमावर,
सुष्टांचा दुष्टांवर,
ज्ञानाचा अज्ञानावर,
सत्याचा असत्यावर,
मांगल्याचा अमंगलावर आणि
विवेकाचा विकारांवर
विजय साजरा करणाऱ्या
विजयादशमीच्या तेजोमय शुभेच्छा...

तमसो मा ज्योतिर्गमय...!

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

हायकू...!


प्रतिभा नि:शब्द
मराठी हायकू पोरका
आज खिन्न विश्रब्ध शारदा...

शिरीष पै यांना शब्दांजली...!

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

रंगवैभव...!


जर कोणी कविता केली,
प्रथम पुरतात जमिनीखाली

पण जुनीशी झाल्यानंतर
शहाणे करतात जंतर-मंतर!

मग कवितेतून रुजतो वृक्ष;
फुले येतात नऊ लक्ष!

- विंदा

आजच्या सगळ्यात सुंदर भावस्पर्शी शुभेच्छा...!

बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

न्याय...!एक शृंखला तुटली जरी
विजय हा अंतीम नव्हे...
माणुसकीचा घेत वसा
नंदनवन जग हे व्हावे...!
 
बातमी

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

जन गण मन...!


जी व्यक्ती अगदी एक दिवस का होईना शाळेत गेली आहे, तिने राष्ट्रगीताबरोबर ‘प्रतिज्ञा’ देखील म्हटली, ऐकली असेल... राष्ट्रगीत समजण्यास अवघड आहे असे मानले तरी ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...’ यात समजण्यास अवघड असे काही नसावे.

‘सद रक्षणाय खल निग्रहणाय’ असे ब्रीद असलेल्या पोलिसांचे काम लोकाभिमुख असते आणि त्यांनी नागरिकांची सेवा करणे अनुस्यूत आहे. या पोलीस दलात सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारतांना, कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून जनसेवा व राष्ट्रकार्य करण्याची एक शपथ घ्यावी लागते हे समजण्यास फार विद्वत्तेची गरज नसावी.

द्रक्ष्याम शीघ्रं संबुद्धं सर्वव्याधिप्रमोचकं । वैद्यराजं महावैद्यं दुःखितानां चिकित्सकं ।। अशी ज्यांच्याबद्दल वेदकालीन धारणा आहे त्या वैद्यक व्यवसायात देखील आपले समाजकार्य सुरु करतांना लोकसेवेची शपथ देण्याची अतिशय उज्ज्वल परंपरा आपल्या देशाला लाभली आहे हे अगदी सर्वांना नाही तरी संबंधितांना माहित असावे.

वकील, अभियंते, वास्तुरचनाकार व इतर व्यावसायिक यांनी आपापल्या व्यवसायात सुसूत्रता यावी आणि समव्यवसायिकांनी संघटीत असावे म्हणून काही शिखर संस्था स्थापन करून त्याचे सदस्यत्व समव्यवसायीकांना देण्याची व्यवस्था असते. असे सदस्यत्व देतांना देखील आचारसंहितेचे नियम हे सदस्यांना बाध्य असतात.

छोटे मोठे व्यावसायिक, दुकानदार, पेढ्या व आडते अशा घटकांच्या नियमनाची प्राथमिक जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असते आणि त्यातील असंघटीत वर्गासाठी शासनाने काही आयोग अथवा मंडळांची योजना केलेली असते जी, अशा घटकांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपले काम करावे यावर लक्ष ठेवून असते.

मोठ्या उद्योगांच्या नियमनासाठी ‘कॉर्पोरेट कार्य मंत्रालय’ या सारख्या शासकीय यंत्रणा कार्यरत असतात ज्या अशा उद्योगांच्या प्रक्रिया व त्यांचे आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय आयाम या संबंधी असलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या यथायोग्य अनुसरणासाठी त्यांच्या एकूण गतीविधी आणि त्याचे सादरीकरण यावर नियंत्रण ठेवतात.

समाजकारण हे मुलभूत ध्येय असले तरी त्यासाठी कराव्या लागणाऱ्या योजना, कायदे व एकूणच व्यवस्थेची देखभाल यात व्यस्त असलेले शासन, अशासकीय सेवाभावी संस्था अथवा संघटना यांचे प्रयोजन मान्य करते. अशा संस्था स्व:तची ध्येय-धोरणे व कार्यप्रणाली ठरवू शकत असले तरी धर्मादाय आयुक्ताकडून ते संमत करून घ्यावे लागते.

नागरिकांच्या हितासाठी ठरविलेली धोरणे, केलेले कायदे आणि संकल्पित योजना यांच्या अंमलबजावणीसाठी शासनास प्रशासनाची जोड लागते आणि प्रशासकीय कार्याची चौकट तत्वत: लोकाभिमुख, निष्पक्ष आणि भक्कम असणे गृहीत असल्याने लोकशाही व्यवस्थेच्या प्रशासकीय आराखड्यात फार मोठ्या त्रुटी असतात असे नाही.

नाव-गाव, जात-धर्म, खान-पान, रिती-रिवाज, आस्था-श्रद्धा, मुल्ये-निष्ठा आणि जीवनशैली या गोष्टी अत्यंत वैयक्तिक असल्याने त्या स्वत:पुरत्या, आपल्या कुटुंबापुरत्या व आपापल्या घरांपुरत्या मर्यादित ठेवून सार्वजनिक जीवनात देशाच्या नागरिकाचा राष्ट्रधर्म पाळत आपले विहित कर्तव्य निभावणे ही वरीलपैकी प्रत्येकाची संवैधानिक जबाबदारी ठरते.

वरील यादीत १३४ कोटी+ भारतीयांपैकी बहुतांचा समावेश असल्याने, या प्रत्येकाने आपापले कर्म सचोटीने, निरलसपणे आणि कर्तव्यभावनेने केल्यास, दिखाव्याच्या प्रसंगी ‘मातीशी इमान’चे भाकड निकष ठरवून देशप्रेमाची उबळ येण्याची आणि समाज-माध्यमातून आपल्या जाज्वल्य देशभक्तीची उधळण करण्याची गरज भासणार नाही.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेल्या भारतीयांत आज १०० कोटींची भर पडली आहे; तेंव्हा स्वातंत्र्य म्हणजे स्वत:च्या तंत्राने जगण्यास मिळालेली मुभा नव्हे तर स्वत:च्या, आपल्या बांधवांच्या, आपल्या राष्ट्राच्या आणि पर्यायाने समस्त मानवतेच्या उद्धाराची आणि उत्कर्षाची जशी संधी आहे तशीच जबाबदारीही याची जाणीव गरजेची आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी २० वर्षांपूर्वी ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ या कवितेतून समस्त भारतीयांस केलेले आर्जव, आज भारताच्या सत्तराव्या स्वात्यंत्रदिनी तेवढेच खरे आहे. भारत महासत्ता होण्याची स्वप्ने बघण्यापूर्वी आपण निदान एवढे करू शकलो तर स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवात भारतमाता तिच्या सर्व लेकरांस सहस्त्र कराने अक्षय्य वरदान देईल... 

स्वातंत्र्यदेवीची विनवणी 
(प्रासंगिक फटका)
(अनंत फंदींचे स्मरण करून)

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालु नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठरी दिवाभितास दडू नका ॥

जुनाट पाने गळुन पालवी नवी फुटे हे ध्यानि धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाउन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतिल दुसरे, बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालुन मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराहि मादक सहज बने ।
करिन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

गोरगरीबा छळू नका ।
पिंड फुकाचे गिळू नका ।
गुणीजनांवर जळू नका ।

उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका ॥
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका॥

पर भाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी ।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ॥ 

भाषा मरता देशहि मरतो संस्कृतिचाही दिवा विझे ।
गुलाम भाषिक होउनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका ॥

कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणु नका ।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाचे तोडु नका ॥

पुत्र पशूसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया ।
परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडु नका ॥

स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे ।
सदन आपुले करा सुशोभित दुसर्‍याचे पण जाळु नका ॥

तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी ।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥

सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामधे धरा ।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालुन पळू नका ॥

करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी ।
एकपणाच्या मारुन बाता ऐन घडीला चळू नका ॥

समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका ।
दासी म्हणुनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका ॥

नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा ।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका ॥

माणूस म्हणजे पशू नसे ।
हे ज्याच्या हृदयात ठसे ।
नर नारायण तोच असे ।

लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका ।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका ॥

- कुसुमाग्रज

रविवार, १६ जुलै, २०१७

पाहुणा...!


जगणे इथले भटक्याची
रात्रींची साठवण...
दोन दिवस आतिथ्य,
चार दिवस आठवण...!

बुधवार, २८ जून, २०१७

इन्तेहा...!

 
असर मेरे वजूद का
इतनाही था शायद
 मैं ख्वाईश करता रहा
और वो इंतजार...!

बुधवार, १४ जून, २०१७

करियर...?
काल दहावीचा रिझल्ट (‘निकाल लागला’ याला मराठीत वेगळाच ‘भाव’ आहे!) जाहीर झाला आणि महाराष्ट्रात १९७ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी (शत प्रतिशत?) गुण मिळविल्याचे जाहीर झाले आणि अनेकांची गणितं चुकली! पुलंच्या भाषेत ‘मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात’ असलो तरी ज्यांनी नव्वदीच्या घरात धैर्याने शिरून थेट शंभरी गाठली त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आता शतकी विक्रमवीर आणि घसरलेली क्रमवारी या सगळ्यांपुढे एकच यक्ष प्रश्न भूतासारखा नाचतोय... पुढे काय? What next? इथे समस्त दहावी पास / नापास विद्यार्थी आणि त्यांचे, काही तूर्तास कृतार्थ तर काही व्यथित पण एकुणात सगळेच संभ्रमीत, पालक यांचे एकहाती, एकसूरी आणि एकात्मिक प्रबोधन (किंवा समुपदेशन) करण्यास धजू नये एवढा मी विवेकपूर्ण विनयशील नक्कीच आहे.

तथापि या निमित्ताने; साने गुरुजींची साधना, मुक्तांगण मित्र आणि महाराष्ट्र मंडळ यांच्या एकत्रित प्रयत्नाने जानेवारी २०१७ मध्ये पुणेकरांना एका अप्रतिम अनुभवाचे साक्षीदार होता आले... पुढे जाण्यासाठी, मागे वळून पाहताना... 
 द्रक्ष्याम शीघ्रं संबुद्धं सर्वव्याधिप्रमोचकं।
वैद्यराजं महावैद्यं दुःखितानां चिकित्सकं।।
असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले आहे त्या एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन डॉक्टरांच्या मुक्त संवादाचा हा कार्यक्रम हा जेवढा प्रेरणादायी होता तेवढाच साक्षात्कारी देखील! कारण यात सहभागी होते ‘मुक्तांगण’चे डॉ. अनिल अवचट, ‘निर्माण’चे डॉ. अभय बंग आणि ‘वेध’चे डॉ. आनंद नाडकर्णी! या तीनही लोकोत्तर (अलीकडे हा शब्द फारसा कुणाला समजणार नाही कारण तशी माणसं हल्ली फारशी घडत नाही आणि जी घडतात ती फेसबुक, whatsapp वर दिसत नाही... असो) पुरुषांशी संवाद साधला तो विवेक सावंत यांनी. 'विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर तळागाळातल्या समूहाच्या उद्धारासाठी झाला पाहिजे आणि कोणताही उद्योग – व्यवसाय अंतिमत: सामाजिकतेच्या दिशेने गेला पाहिजे' शी धारणा असणाऱ्या या विवेकी सावंतांसारखे सगळेच लोक आपले नाव सार्थ करीत जगले तर आयुष्य किती सुंदर होईल... तेही एक असो!

मुद्दा असा की अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या संपूर्ण कार्यक्रमाची (ज्याला सुमारे १५०० श्रोते जीवाचे कान करून अडीच तास स्व पलीकडे म्हणजे काय याची अनुभूती घेत होते) ध्वनिचीत्रफित यू ट्यूब वर उपलब्ध करून जगभरातल्या मराठी भाषिकांची एक मोठीच सोय करून देण्यात आली. शिवाय ‘साधना’च्या अंकात दि. १८ मार्च २०१७ रोजी ही संपूर्ण मुलाखत शब्दांकित करून छापण्यात देखील आली आहे.

सूर्याच्या तेजाचे वर्णन केल्यावर काजव्याने आपल्या टीवल्याशा प्रकाशाचे वर्णन करू नये एवढे व्यवहारज्ञान मला असले (चक्क?) तरी, आपली टिमकी वाजवायची नाही तर पोस्ट सोशल करून उपयोग काय, नाही का? तेव्हा, शनिवार, दि. १९ डिसें. २०१५ ला एस-ओ-एस व्हिलेज पुणे आयोजित करिअर फ़ेअर मध्ये युवामनाच्या 'हौसला अफजाई' साठी अस्मादिकांनी केलेली रचना इथे चिटकवून ठेवतो... तेवढीच वाचकांना रसग्रहणाची संधी!
सौदा इथे सगळ्याचाच
काहीच मिळत नसते फुकट,
यशाला नसतो शॉर्ट-कट अन
वाट सत्याची नेहमीच बिकट…

गुंड असतात मुळात भ्याड
सूज्ञ जमवीत नाहीत झुंड,
अन्यायाविरुध्द कुठल्याही
अन निर्भयतेने थोपट दंड…

कधी उन तर पाऊस कधी
चुकणार ना सृष्टीचे चक्र,
ग्रह-ताऱ्यांना भुलू नकोस
कोण मार्गी, कुठला वक्र…

देव-दानव कुणि नको
निर्लेप जग आयुष्य,
दोघांनाही असूयेने
वाटू दे, व्हावे मनुष्य…!

प्रत्येक क्षणातून तू
शिकून घे नवे काही,
आला क्षण गेला क्षण
हा क्षण फिरुनी नाही…

निर्धारांना चढव धार
प्रयत्नांचे इमले रच,
कितीही वाटले कठीण
खाऊ नको मुळी कच…

स्वप्न बघ आभाळाचे
अन घे गरुडभरारी,
निवडलेल्या वाटेवरून
फिरू नकोस माघारी…

अंधार कितीही दाटला तरी
रात्र संपून पहाट होईल,
रोज नव्याने उगवून सूर्य
गीत वसुंधरेचे गाईल…!

शनिवार, ६ मे, २०१७

संस्कृती...?

पिकते तेथे विकत नाही पण विकते तेथे पिकते...?

video

पहिला व्हिडीओ मुंबईतील विले पार्ले भागातील महाराष्ट्र दिन ढिंग टांग सेलिब्रेशनचा आणि दुसरा व्हिडीओ अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअर, न्यूयॉर्क येथील महाराष्ट्र दिवस सांस्कृतिक सोहळ्याचा... पहा आणि विचार करा!


कोण नक्की संस्कृती जतन करतंय आणि कुठली...? 

सौजन्य : एक संस्कृती-रक्षक मुंबईकर!

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

ज्ञान गुन सागर...!


न बले विद्यते तुल्यो न गतौ न मतौ परः

बल, बुद्धि आणि गतिमध्ये वानरवीर, कपिश्रेष्ठ हनुमंताची बरोबरी करणारा दुसरा कुणीही नाही. 

प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करून आपल्या प्राणप्रिय सीतेस त्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी समुद्राच्या दक्षिण तटावर पोहचले. अशोकवनात शोकमग्न सीतेला आपल्या आगमनाची सूचना व लवकरच तिच्या होणाऱ्या मुक्तीचा व राम-सीता पुनर्मिलनाचा दिलासा देण्यास कुणास धाडावे असा प्रश्न त्यांना पडला. दक्षिण तटापासून लंकेची भूमी शंभर योजने दूर. एवढे अंतर एका दमात लांघून जाण्यायोग्य कोण वीर आपल्या सेनेत आहे या विचारात प्रभू असतांना वानर योध्यांनी वेगवेगळ्या योजने उड्डाणांचे दावे केले पण ते शंभराच्या जवळपासही पोहचणारे नव्हते. अशा अत्यंत नाजूक वेळी हनुमंत मात्र काहीही न बोलता एका शिळेवर चिंतातूर बसलेला पाहून प्रभू रामास मोठा विस्मय झाला आणि त्यांनी जांबुवंताकडे पृच्छा केली. तेव्हां जांबुवंत म्हणाले, ‘हे प्रभो, या सर्वशक्तीशाली आणि महाप्रतापी अशा वानरसेनेचा सेनापती होण्याची योग्यता आणि शंभर योजने उड्डाणाचे सामर्थ्य केवळ हनुमंताकडे आहे परंतु त्याला बालपणी मिळालेल्या शापाने त्यास आपल्या सामर्थ्यांचा विसर पडला आहे. त्याला त्याच्या सामर्थ्यांचे स्मरण करून देताच तो उड्डाणास सिद्ध तर होईलच शिवाय त्याचे सामर्थ्य कलाकलाने वाढू लागेल!’

असा कोणता शाप हनुमंताला भोगावा लागला आणि का?

मारुतीच्या शैशवात एके सकाळी माता अंजनी आपल्या वायुपुत्रासाठी फळे आणण्यासाठी वनात गेली असता थोडी दूर निघून गेल्याने, मातृवियोग आणि भूक याने कासावीस झालेला बाल हनुमान उघड्या अंगणात आला आणि उगवत्या सूर्याला पाहून त्याला या गरगरीत लालचुटुक फळाचा फारच मोह पडला. हे फळ निश्चितच मधुर असणार या विचाराने तो त्याच्या दिशेने आकाशात झेपावला. एवढे छोटेसे बालक सहस्त्रावधी योजने उड्डाण करतांना पाहून या दैवी बालकास कुणीतरी रोखावे म्हणून सगळ्यांनी इंद्राचा धावा केला. इंद्र वायुपुत्राची वाट अडवेपर्यंत बच्चमजी सूर्यापर्यंत फक्त पोहचलेच नव्हते तर त्यांनी तो तेजोनिधी लोहगोल गट्टम केला होता! सूर्याच्या तेजाने सुफलित झालेली पृथ्वी आणि प्रदिपित झालेले आकाश या सगळ्यावर अंध:कार दाटला आणि हाहा:कार माजला. काळ जणू थांबला! आता निरुपाय झाला म्हणून इंद्राने बाल हनुमानाच्या डोक्यावर वज्राने प्रहार केला आणि त्याच्या मुखातून गगनराज भास्कराची सुटका झाली. परंतु चक्क दिनमणी व्योमराज मुखात ठेवल्याने बाल हनुमंताचे दोन्ही गाल लालबुंद होवून टम्म सुजले ते कायमचे आणि त्या वज्राघाताने तो तात्काळ मूर्च्छित झाला.

सूर्याच्या दिशेने आपल्या पराक्रमी पुत्रास उडतांना पाहून पवन राजाने त्याच्या रक्षणासाठी त्याच्या मागे धाव घेवून, सूर्याच्या तेजाने तो करपू नये म्हणून अतिशय शीतल हिमरूप धारण केले होते. आपला पुत्र मूर्च्छित झालेला पाहताच वायू भयंकर कोपित झाला आणि आपल्या पुत्रासह एका गुहेत जावून बसला. वायुने आपले कार्य थांबविल्याने सर्व चराचर सृष्टी आणि प्राणीमात्रांचे प्राण कंठाशी आले आणि आता सर्व काही संपणार अशी परिस्थिती दिसू लागली. वायुराजाची मनधरणी करून त्याचा राग शांत व्हावा व सृष्टीचे कार्य पुन्हा सुरळीत व्हावे म्हणून देवादिकांनी ब्रह्माची आळवणी केली. स्वत: ब्रह्मदेव देवता, गंधर्व, नाग आणि गुह्यक आदि प्रजांना बरोबर घेऊन गेले. तेथे त्यांना वायुदेवाच्या मांडीवर सूर्य, अग्नी, सुवर्ण यांच्याप्रमाणे अंगकांती असणारे हनुमान दिसले. ब्रह्मदेवाला दया आली. त्याने त्या शिशुच्या अंगवरूनही हात फिरवला. ब्रह्मदेवांच्या हाताचा लीलापूर्वक स्पर्श होताच शिशु हनुमान जागे झाले. बालक जिवंत झालेले पहाताच वायुदेव प्रसन्न झाले. ते चराचरात पूर्ववत संचार करु लागले. या बालकाच्या द्वारा भविष्य़ात देवांचीच बरीच कार्ये सिद्धीस जाणार होती हे ओळखून ब्रह्मदेवांनी तेथे आलेल्या सार्‍या देवतांना त्या बालकाला वर देण्यास सांगितले.

इंद्राने वर दिला की हा आपल्या वज्राने सुद्धा मारला जाणार नाही. सूर्याने त्यांना आपल्या तेजाचा शंभरावा भाग तर दिलाच पण असेही सांगितले की आपणच या बालकाला शास्त्रज्ञान देऊ की ज्यामुळे य़ा बालकाची शास्त्रज्ञानात कोणीही बरोबरी करू शकणार नाही व हा उत्तम वक्ता होईल. आपल्या पाशाने या बालकाचा मृत्यु होणार नाही असा वरुणाने वर दिला. आपल्या दंडाने हा अवध्य व निरोगी होईल असा यमाने वर दिला. आपल्या गदेने हा कधी युद्धात ठार मारला जाणार नाही व याला युद्धात कधी विषाद होणार नाही असा वर कुबेराने दिला. शंकरांच्या आयुधांनी हा मारला जाणार नाही असा शंकराने वर दिला. विश्वकर्मा म्हणाला की आपण जेवढी दिव्य अस्त्रे बनवली आहेत, त्यांच्यापासून अवध्य होऊन हा बालक चिरंजीवी होईल. हा दीर्घायु, महात्मा तसेच सर्व प्रकारच्या ब्रह्मदण्डांपासून अवध्य होईल असा वर देऊन ब्रह्मदेव वायूला म्हणाले, “मारुत ! तुमचा हा पुत्र मारुति शत्रुसाठी भयंकर आणि मित्रांसाठी अभयदाता होईल. युद्धात कोणीही याला जिंकू शकणार नाही. हा इच्छेनुसार रूप धारण करू शकेल, जेथे इच्छा असेल तेथे जाऊ शकेल, याची गति याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तीव्र अथवा मंद होईल तसेच ती कुठेही अडणार नाही. हा कपिश्रेष्ठ अत्यंत यशस्वी होईल. हा युद्धस्थळी रावणाचा संहार आणि भगवान्‌ श्रीरामचंद्रांची प्रसन्नता संपादन करण्यासाठी अनेक अद्‌भुत तसेच रोमांचकारी कर्मे करील”.

सामर्थ्य प्राप्त झाले की मग ते शारीरिक असो वा आर्थिक असो त्यामुळे प्राणी उन्मत्त होतो. हनुमानही याला अपवाद ठरले नाहीत. वर मिळल्यामुळे हनुमान निर्भय होऊन महर्षिंच्या आश्रमांत परत परत जाऊन उपद्रव करीत होते. हे शान्तचित्त महात्म्यांची यज्ञोपयोगी पात्रे फोडून टाकत असत, अग्निहोत्राचे साधनभूत स्त्रुक, स्त्रुवा आदि तोडून टाकीत आणि ढीगावर ठेवल्या गेलेल्या वल्कलांना चिरून, फाडून टाकीत असत. ते अवध्य असल्यामुळे सर्व ऋषीही विवश होऊन त्यांचा हा उपद्रव सहन करत होते. वायूने या आपल्या बालकाला वारंवार समजावले. पण हनुमानांचे उपद्रव देणे थांबले नाही. तेव्हा भृगु व अंगिरांच्या कुळात जन्मास आलेल्या ऋषींनी यांना शाप दिला की, “वानरवीरा ! तू ज्या बळाचा आश्रय घेऊन आम्हाला कष्ट देत आहेस त्याचा आमच्या शापाने मोहित होऊन तुला दीर्घकाळपर्यंत विसर पडेल. तुला स्वतःच्या बळाचा पत्ताच लागणार नाही. जेव्हा कोणी तुला तुझ्या कीर्तीचे स्मरण करून देईल, तेव्हा तुझे बळ वाढेल.” तेव्हा त्यांना आपल्या बळाचे विस्मरण झाले व ते मृदुल प्रकृतिचे होऊन विचरण करू लागले. अर्थात जरी ते आपल्या बळाने गर्विष्ठ झाले होते तरी त्यांचा उपद्रव हा खट्याळ बालकाला शोभणारा होता, म्हणून ऋषींनी त्यांना दिलेला शाप अतिशय सौम्य स्वरूपाचा होता.

अशी कथा वाल्मिकी रामायणातील उत्तराकांडात येते.

प्रत्येक माणसालाही काही एक सामर्थ्याचा वर जरूर मिळालेला असतो पण आपल्याच विकार-आवेगांच्या मस्तीत जीवास त्याचा विसर पडतो. योग्य स्थळी, योग्य वेळी, योग्य महानुभावाच्या माध्यमातून आपल्यातील या क्षमतेचे भान आल्यास आपल्या जीवितकार्याची जाण साधारण मानवास देखील होवू शकते. चिरंजीव हनुमंताची पात्रता मर्त्य मानवाच्या अंगी नसल्याने, प्रभू रामचंद्राच्या कृपेने जांबुवंतासारखा 'जागल्या' त्याच्या नशिबी नसला आणि कुणास गुरु करण्याचा विनय देखील आपल्याच मस्तीत जगणारा मनुष्य दाखवू शकत नसला, तरी एक गोष्ट जन्मत:च सगळ्याच मनुष्यप्राण्यांना निसर्गाने बहाल केलेली आहे, त्याच मानवी वैशिष्ट्याला आपण आपला वाटाड्या बनवू शकलो तर आजच्या जगातील बऱ्याचशा समस्या चुटकीसरशी सुटतील. त्या आपल्या अंतरी सदोदित वास करणाऱ्या पथदर्शकाचे नाव... विवेक! आणि त्यास सहवेदनेची जोड मिळाल्यास मनुष्यत्व शंभरच काय सहस्त्र योजने देखील झेप घेवू शकेल...

बघा पटतंय का... आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर, सहवेदनेच्या भावाने आणि विवेकाच्या साथीने, घेऊ या शोध आपल्यातील सुप्त क्षमतांचा...?

शुभम भवतु !

मंगळवार, २८ मार्च, २०१७

नवउन्मेष...!


रेशमी शेल्याने नटली बांबू काठी
कडुनिंबाचा साज, साखरेच्या गाठी...
तांब्याची झळाळी शोभे आभाळी
चैत्र पालवीला आज नवी नव्हाळी ...!

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात नववर्षारंभी गुढी पाडव्याच्या नवउन्मेषी शुभेच्छा...!

गुरुवार, २३ मार्च, २०१७

म. टा.


'वर्तमानपत्रातील सर्वात वाचनीय गोष्ट म्हणजे अग्रलेख' हे बाळकडू आम्हाला पाजणारे, वृत्तपत्रीय लिखाणाचा वस्तुपाठ घालून देणारे आणि 'पत्र नव्हे मित्र' या बिरुदाने महाराष्ट्र टाईम्सला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे तळवलकर सर केवळ मटालाच नाही तर अवघ्या पत्रकारितेला पोरके करून गेले. निर्भीड, निष्पक्ष, मार्मिक, विचक्षण, मर्मग्राही, साक्षेपी, द्रष्टा तथा व्यासंगी ही विशेषणांची रत्नमाला ज्यांच्या गळी शोभावी अशी; जांभेकरांपासून सुरु होऊन, आगरकर, गोखले, टिळकांनी आचार्यांकडे सोपवलेली मराठी बाण्याच्या पत्रकारितेची परंपरा आज अगदी खंडित झाली नसली तरी स्तब्ध झालीय एवढे नक्की! आजच्या डिजिटल युगातही वर्तमानपत्राशीवाय दिवस सुरु न होणाऱ्या आमच्या पिढीला या संस्कारकर्त्याची उणीव सदोदित भासेल... गुरुतुल्य श्री. गोविंद तळवलकर सरांना अखेरच्या दंडवताची मन:पूर्वक शब्दसुमनांजली!

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।

मंगळवार, १४ मार्च, २०१७

तुका आकाशाएवढा...!


बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी ।
कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥

विचार करितां वांयां जाय काळ ।
लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥

तुका म्हणे तुम्ही करा घटापटा ।
नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥

तुकाराम बीज दिनाच्या सर्व भाविकांस शुभेच्छा!