रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

‘राम’...!


रामायण हे केवळ एक महाकाव्य नव्हे तर ते एक तत्वचिंतन आहे जे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात शोधू शकतो...

‘रा’ म्हणजे प्रकाश आणि ‘म’ म्हणजे आतला. ‘राम’ म्हणजे आतला प्रकाश, अर्थात आपले अंतर्मन किंवा अस्तित्वाचे भान...! कसे ते पाहू या... 

'श्रीराम' हा राजा 'दशरथ' आणि राणी 'कौसल्या' यांचा जेष्ठ पुत्र. दश रथ म्हणजे ज्याच्याकडे दहा रथ आहेत. हे दहा रथ प्रतिक आहेत पाच 'ज्ञानेंद्रीये' आणि 'पंचेद्रीये' यांचे. कौसल्या म्हणजे कुशल. दहा रथांचा कुशल वापर ‘रामा’सारख्या तेजस्वी पुरुषोत्तमास जन्म देतो!

रामाचा जन्म अयोध्येत झाला. अ-योध्या म्हणजे जेथे युद्ध घडू शकत नाही. जिथे संघर्षाला, वैराला, विषादाला स्थान नसते असे मन शुद्ध असते आणि शुद्ध मनात कायम प्रकाशाचा, तेजाचा, ज्ञानाचा वास असतो!

अंतरात्मा हा ‘राम’ आहे आणि आपले मन हे ‘सीता’. श्वास किंवा प्राण जी आयुष्याची दोरी आहे तो वायुपुत्र ‘हनुमान’, विवेक हा ‘लक्ष्मण’ तर अहं हा ‘रावण’! ‘अहं’ जेव्हा ‘मना’चे हरण करतो तेव्हा ‘आत्मा’ कष्टी होतो. परंतु आत्मा स्वत:हून मनापर्यंत पोहचू शकत नाही, त्यासाठी त्याला प्राणाची गरज लागते. संपूर्ण 'विवेक'भानाने आणि 'प्राणा'च्या सहाय्याने 'आत्मा' आणि 'मन' यांचे पुनर्मिलन घडते तेव्हा 'अहं' नष्ट होतो... 

बघा तुमच्या अनुभवाशी जुळतंय का...?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा