बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

तह...!


सोहळे त्यांच्या दांभिकतेचे
इथे नित्य पाहतो मी...
अन मानभावी वर्षावात
शुष्क राहूनी, नाहतो मी...!

प्रवाही क्षणांच्या बेधुंद वेगात
थिजून खळाळत वाहतो मी...
श्वासही जड होता इथे,
विश्वाचा भार वाहतो मी...!

पतीत मी अन पराक्रमीही
युद्धात जिंकूनी तह साहतो मी...
श्रोत्याच्या प्रच्छन्न अभावात
निमूट मौनात राहतो मी...!

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

गीतार्थ...!


महाभारताचे एक विचक्षण निरूपण

उपोदघात: महाभारताच्या १८ दिवसांच्या युद्धात, त्या मानव वसाहतीमधील सुमारे ८० प्रतिशत पुरूष योद्ध्यांची हानी झाली अशी नोंद इतिहासात आहे

महाभारताचे धर्मयुद्ध संपले आणि ते जेथे घडले त्या कुरूक्षेत्रावर संजय पोहचला. महाभारत समजून घेण्यासाठी तेथे पोहचणे आवश्यक होते हे तो जाणून होता. संजयने सभोवार नजर फिरविली आणि विचार केला, 'महाभारत खरोखरीच घडले असेल? माझ्या पावलांखाली जी जमीन आहे तिने एवढा रक्तपात शोषला असेल? रणवीर पांडव आणि त्यांचा मितवा श्रीकृष्ण या ठिकाणी ऊभा असेल जिथे मी ऊभा आहे?' 

'त्याचे सत्य तुला कधीही उमजणार नाही...' एक वृद्ध आणि मृदू आवाज आला

संजय वळला आणि पाहतो तो काय, केशरी आवरणात लपेटलेली एक वृद्ध आकृती धुळीच्या लोटातून प्रकटली

'मला कल्पना आहे तू येथे कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धाबद्दल जाणून घेण्यासाठी आला आहेस, पण तू त्या युद्धाबद्दल तोपर्यंत जाणून घेऊ शकत नाहीस जोपर्यंत तुला खऱ्या युद्धाची कल्पना नाही!' म्हातारा गूढरम्य पद्धतीने बोलला

'आपल्याला काय म्हणायचे आहे...?' संजयला क्षणार्धात उमगले की तो अशा व्यक्तीच्या सान्निध्यात आहे जो इतर कुणाही जीवित व्यक्तीपेक्षा या युद्धाबद्दल अधिक जाणतो

'महाभारत हे एक महाकाव्य असेल, एखादी दंतकथा किंवा कदाचित इतिहास देखील परंतु ते एक तत्वज्ञान खचितच आहे.' वृद्धाच्या हलक्याशा स्मितोद्गाराने संजयची जिज्ञासा पुरेशी चाळवली.

'तसे असेल तर आपण मला ते तत्वज्ञान ऐकवाल?' संजयने विनवणी केली

'जरूर! ऐक तर...' म्हातारा पुढे बोलू लागला. 'पांडव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माणसाची पंचेंद्रिये - दृष्टी, गंध, रुची, स्पर्श आणि ध्वनी आणि कौरव म्हणजे कोण माहितेय...?' डोळे बारीक करून म्हातारा विचारता झाला. संजयने नकारार्थी मान हलवली

'कौरव म्हणजे माणसाच्या ज्ञानेंद्रियांना नित्य प्रलोभनात पडणारे, षडरिपूजन्य शंभर विकार! पण माणूस त्यांच्याशी लढू शकतो, विचार बरे कसा?' संजयने पुन्हा एकदा नकारार्थी मान डोलवली

'जेव्हा तो निळा सावळा कृष्ण कन्हैय्या तुमचा सारथी असतो.' हे सांगतांना वृद्धाचा चेहरा स्मितहास्याने उजळला आणि संजयला जणू गूढज्ञान झाले.

'कृष्ण हा तुझ्या आतला आवाज आहे, तुझा आत्मा आहे, तुझा पथप्रदर्शक विवेक आहे आणि तू तुझे आयुष्य त्याच्या हाती सोपविलेस की तू चिंतामुक्त होतोस.' 

अर्जुनासारखाच दिग्मूढ झालेला संजय अचानक काही सुचून विचारता झाला, 'असे असेल तर द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म विकारी कौरवांच्या बाजूने का लढतात?' 

संजयच्या मर्मग्राही शंकेने कष्टी होऊन म्हातारा मान हलवीत उत्तरला, 'त्याचा अर्थ असा की जसजसे माणसाचे वय वाढते आणि जगण्याचे भान विस्तृत होत जाते तसतसे त्याचे आपल्या वडीलमाणसांबद्दलचे समज बदलत जातात. वाढत्या वयात आपण ज्या वडीलधाऱ्यांना आदर्श मानत होतो ते तेवढे आदर्श नसतात हे उमजू लागते. त्यांच्यातही उणिवा असतात, मर्यादा असतात. आणि एके दिवशी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की ते तुमच्या भल्यासाठी आहेत की अध:पतनासाठी. त्यावेळी तुम्हाला कदाचित अशीही उपरती होऊ शकते की तुम्हाला जे योग्य आहे आणि सत्य आहे त्यासाठी त्यांच्याशीच लढणे क्रमप्राप्त आहे. आयुष्याच्या वाटेवर जगण्याचा अर्थ जाणून घेतांना भेटणारे हे सगळ्यात अवघड वळण असते आणि म्हणूनच गीता आवश्यक आहे.' 

संजय गलितगात्र होऊन जमिनीवर कोसळला, थकून नव्हे तर म्हातारबुवांनी सांगितलेल्या तत्वातील विषाद त्याच्या अंतर्मनाला भिडल्याने. शरीरातील सर्व त्राण एकवटून तो पुटपुटला, 'आणि कर्णाचे काय?' 

'अरेच्चा, तू सगळ्यात गहन ते शेवटासाठी राखून ठेवलेस की!' म्हातारा सांगू लागला

'कर्ण हा तुझ्या जाणिवांचा सहोदरच नव्हे का? कर्ण म्हणजेच तुझ्या इच्छा, कामना, आकांक्षा. तुझ्या अस्तितवाचा अविभक्त भाग असूनही तो विकारांच्या बाजूने उभा राहतो. त्याला सतत उपेक्षीत वाटते आणि त्याचे परिमार्जन तो विकारांची सोबत करण्यासाठी निरनिराळ्या सबबी देऊन करतो, अगदी तुझ्या वासना नेहमीच करतात तसे. विकारांच्या अधीन होण्यासाठी तुझे मोह तुला भाग पडतातच की नाही?'

संजयने हलकेच मान हलवली... यावेळी होकारार्थी! संजय सर्व गोष्टींची संगती लावत अत्यंत विचारमग्न होऊन अधोवदन बसून होता आणि त्याने जेव्हा मान उचलून वर पाहिले तेव्हा ती वृद्ध आकृती अंतर्धान पावली होती... त्याच धुळीच्या लोटामध्ये... जगण्याचे एक विलक्षण भान मागे ठेवून!

- मुक्त चिंतन