शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

मी मरणावर हृदय तोलले...


आज मंगेश पाडगांवकरांचा प्रथम स्मृतिदिन... कितीही अविश्वसनीय वाटत असलं तरी काळाची पावले कोण रोखू शकलंय... त्यांच्याच अजरामर शब्द सुरांनी त्यांना आदरांजली...!
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥

चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥

हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥

रविवार, २५ डिसेंबर, २०१६

व्याज...!


मनी आर्त विश्वाचे
डोळ्यात स्वप्नं वेडी...
पंख गरुडाचे अन 
पायात गंजली बेडी...!

हात बांधलेले तरी
हृदय सतार छेडी...
नागरी घुसमटीत
स्वप्नी नित्य खेडी...!

बुद्धी जखडलेली
मन पाखरं येडी...
जन्मूनी संचिताचे
कर्म व्याज फेडी...!

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

लढा...!


हार जीत ठरविण्याचे इथे
बदलले आहेत निकष काही...
दिसली ती फक्त झलक होती
त्वेषाने मी अजून लढ़लोच नाही...!

ज्या शिड्यांवरून गडगडली
माडी कचकड्याच्या दिखाव्याची...
भुलवले कितीदा मलाही, पण
पायरी ती मी कधी चढलोच नाही...!

गळून पडले उत्सवी मुखवटे अन
उसवली वीण जी विरलीच होती...
बेगडी सजावटीतून मिरविण्या
मी मुखवट्याआड दडलोच नाही...!

शस्त्र परजावीत त्यांनी आता
जी कोकरांचा काळ होती...
त्यांच्या वाराने जायबंदी होईल
इतका ठिसूळ मी घडलोच नाही...!

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

On a Different 'Note'...


यंदाच्या वर्षी बाप्पाने गाऱ्हाणे ऐकले म्हणायचे... 

ये रे ये रे पावसा 
तुला देतो पैसा 
पाऊस आला मोठा 
पैसा झाला खोटा...!

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

आयुष्य...!

बरोब्बर एक वर्षापूर्वी, ३० ऑक्टोबर २०१५ ला मी फेसबुकवर हे पोस्ट केले होते. प्रदीप रस्से सरांच्या सौजन्याने ते आज पुन्हा जिवंत झाले. आज पुन्हा वाचतांना त्याचे प्रयोजन व कालसापेक्षता कमी होण्याएवजी वाढलेली जाणवली आणि प्राणसखा, मित्रबंधू कुमार याने पाठवलेल्या शांताताई शेळकेंच्या एका विचक्षण निरीक्षणासह त्याची इत्यादीवर स्थापना करण्याची इच्छा झाली... 

अंगावरचा पालवीचा निरर्थक पसारा सावरीत,
झाडाची मुळे वर्षानुवर्ष जातच असतात खोल... 
स्वीकारतात अटळपणे भुई खालचे जगणे अदृश्य,
चाचपतात अंधार, मिळेल ती शोषून घेत ओल... 

झाड मोहरते, थरथरते, डवरते, झडतेही... 
शहाणे यालाच आयुष्य म्हणतात कि काय...?

 
दि. ३० ऑक्टोबर २०१५ - फेसबुक पोस्ट

गिरीशच्या विनंतीवरून काही लिहितोय म्हटले तर अर्धसत्य ठरेल… गिरीशची विनंती निमित्त (की impetus) झाले एवढे निश्चित! मी डेली मेल नावाचा एक उपक्रम काही काळ चालवला हे आपणांस विदित आहेच. अशाच काही कारणांनी मी तो थांबवला तेव्हां काही 'निवडक' लोकांनी माझी विचारपूस केली आणि माझा हेतू साध्य झाला! त्यानंतर मी ब्लॉग, सोशल मिडिया, ई-पेपर अशा माध्यमातून प्रकटत राहिलोच, कुणी बघो न बघो, कुणी वाचो न वाचो, कुणी लाईको न लाईको, कशाचीच पर्वा न करता. हे उद्योग मी का चालवले आहेत त्याची मला उमगलेली ३ कारणे फक्त शेयर करतो (हल्ली काहीही करण्यापेक्षा 'शेयर' करणे जास्त महत्वाचे आहे आणि आपल्या कुठल्याही कृतीच्या सर्वव्यापी आणि दूरगामी परिणामांपेक्षा त्यावरील 'लाईक्स'च्या संख्येचे वजन जास्त भरते, ते असो) त्याचे आपण अनुसरणच काय लाईक नाही केले तरी चालेल…!

'मि. शिरीष, तुम्ही लिहिता एव्हढ पण वाचत का कुणी?' असा प्रश्न विचारणारे डॉ. कणेकर जरी मला लाभले नाही तरी प्रश्नाची भेदकता कमी होत नाही. पण ती दुर्लक्षून मी लिहिता राहण्याची गुपिते अशी -
१. लिहिल्याशिवाय मला स्वस्थ झोप लागत नाही. शेरपा तैन्सिंगला कुणा विक्रमचक्रमाने विचारले 'तुम्ही एव्हरेस्ट वर पुन्हा का जाता?', शेरपा उत्तरला 'तो तिथे आहे म्हणून!' चार्लीने त्याच्या शेवटच्या काळात खूप वाईट परिस्थितीत सिनेमे काढले. त्याची मैत्रीण त्याला म्हणाली 'तू हे कशासाठी करतोयस?' चार्ली म्हणाला 'माझ्या रक्तातून सिनेमा वाहतो!' पेलेला त्याच्या आयुष्यातला पहिला मानधनाचा चेक मिळाला तेव्हा त्याचा विश्वास बसेना. तो उद्गारला 'म्हणजे मला फुटबॉल खेळण्याचे पैसे पण मिळतील? मला तर खेळण्यातच पुरेसा आनंद मिळतो!' तात्पर्य, तुलसीदासाने सुद्धा रामायण 'स्वान्त सुखाय' लिहिले असे तो पहिल्याच पानावर जाहीर करतो…!
२. जगणे ही क्षणांची कणाकणाने घडत जाणारी अखंड माळ आहे. प्रत्येक क्षण दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे पण सुटा नाही. वयोमानानुसार स्मरणशक्ती क्षीण होत जाईल तेव्हा चांगल्या प्रकारे जगलेले पण आठवू न शकणारे क्षण सगळ्यात जास्त त्रास देणार, वाईट आठवणी जाता जात नाहीत… अगदी स्मृतिभ्रंश झाला तरी! माणूस मूलत: आशावादी असतो आणि लिहितांना तो विचक्षण दार्शनिक (निदान स्वत:पुरता) होतो. तेव्हा प्रचारकी साहित्य प्रसाविणार्यांव्यतिरिक्त इतर माणसे चांगल्या विचारांच्या, चांगल्या आठवणींच्याच नोंदी ठेवतात असे निदर्शनास येते. तेव्हा अशा लिखाणायोगे अगदी विश्रब्ध शारदेची उपासना जरी होऊ शकली नाही तरी साहित्यभांडारात सर्वतोपरी भर पडतच असते. शिवाय लेखनमूल्य, साहित्यिक दर्जा, भाषेची समृद्धी वगैरे गोष्टींचा उहापोह करण्यासाठी समीक्षक मंडळी आहेतच की. त्याचीही चिंता आपणच केली तर त्यांना काय काम?
३. लेखनाचे पहिले काम अविष्कार (व्यक्त होणे), दुसरे संवाद (इतरांबरोबरच स्वत:शीही) आणि तिसरे पाळत (जागल्या बनून पहारा ठेवणे). Writers are the conscious-keepers of the society. रोजच्या धकाधकीच्या जीवनात समाजाला बऱ्याचदा (प्र)गतीची झापड आल्याने चांगले-वाईट, नीती-अनीती, वैध-अवैध, इष्ट-अनिष्ट याची चाड रहात नाही किंवा जाण होत नाही. अशा प्रसंगी केवळ लेखकच पंचाच्या तटस्थ भूमिकेतून प्राप्त परिस्थितीचे निर्हेतुक, निष्पक्ष परिशीलन करून मार्ग दाखवू शकतो. तो मार्ग चोखाळायचा किंवा नाही हा सर्वस्वी समाजाच्या परिपक्वतेवर अवलंबून असलेला समाजाचा निर्णय असला तरी म्हणून लेखन होतच रहायला हवे. अगदी काहीच नाही तर पुढल्या काळातील इतिहास संशोधकांना या काळातील समाजाच्या अभ्यासाची काही साधने मिळतील.

असो. ललित लिखाण खूप झाले. पण मला पर्याय नाही, माझ्याकडे परत करायला म्हणून देखील एकही पुरस्कार नाही (येत्या काळात 'औषधालाही' चे समृध्द रूप म्हणून 'परत करायलाही' रुजणार आहे म्हणतात) तेव्हा मला व्यक्त होण्यासाठी लिहिण्याशिवाय तरणोपाय नाही. आपल्याकडे असल्यास (पर्याय, पुरस्कार नाही) त्याचाही प्रयोग करून पहावा आणि फसल्यावर सत्वर पुन:र्लीखाण सुरु करावे ही सदिच्छा!

टिकटिकच्या प्रतीक्षेत आणखी एक अमूक...!

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

सन्यस्त...!


सूर्यास टांगूनी क्षितिजी
चंद्र सजवितो रात्री...
मनाचा सन्यस्त गाभारा
षडरिपू नांदती गात्री...!

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

एव्हढं तरी कराच...!


यंदाच्या दिवाळीत, हा मेसेज (थोडा मोठा असला तरी) वाचू शकताय त्याअर्थी तुम्ही सुस्थितीत आहात असे मानायला हरकत नाही. तुमच्याकडे एक कॉम्प्युटर/स्मार्टफोन, त्याला कनेक्टीव्हीटी आणि हे वाचण्या इतका वेळ आहे म्हणजे तुम्हाला अगदी पुढच्या क्षणाचा, दिवसाचा, आठवड्याचा, महिन्याचा, वर्षाचा, निवृत्तीनंतरचा किंबहुना पुढच्या पिढीचा देखील प्रश्न नसावा. तेव्हा आपले दिवाळीचे बेतही ठरले असतील. असायलाच हवे, नाही तर ‘एवढे सगळे’ कशासाठी करायचे, बरोबर ना? सण, उत्सव हे साजरे करण्यासाठीच असतात, अगदी मान्य! आणि ‘खरेदी’ हा साजरे करण्याचा अविभाज्य घटक असतो हेही मान्य. शिवाय त्यामुळे आपल्या अर्थकारणास गती मिळते ती वेगळीच. पण आपण गती दिलेले अर्थकारण कुठल्या दिशेने जाते आहे हे पाहणे देखील आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, नाही का? एवढ्या अतुल्य आणि खंडप्राय देशात सगळ्याच गोष्टी शासन प्रशासन नाही करू शकणार, त्यांनाही मर्यादा आहेत. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे ना आपली? मग आपली जबाबदारी काय केवळ राजकारण्यांसाठी ‘एक मत’ एवढीच आहे... समाजकारणासाठी एकमत, एकजूट नाही? आपल्या एका छोट्याशा राज्याएवढा 'भूतान' जे करू शकतो ते आपल्यासारख्या प्राचीन संस्कृतीस अशक्य असावे? मुळीच नाही!

उत्सव हे आनंद साजरे करण्याबरोबरच सुख वाटण्यासाठी आणि समाजाचे ऋण मान्य करण्यासाठी सुद्धा असतात. अगोदरच ‘लंबोदर’ असलेल्या तुंदिलतनूस अतार्किक आणि अविवेकी कारणांसाठी भोग लावून चरबी वाढविण्यात ‘सहाय्य’ करण्यापेक्षा, ज्यांना पक्वान्नच काय, केवळ संतुलित चौरस आहार अगदी सणावारी देखील नशिबी नाही त्यांच्या, निदान उत्सवकाळापुरता का होईना, दोन वेळेच्या पूर्णब्रह्माची सोय केलीत तर बाप्पा देखील आपोआपच खूष होईल. बरं, हे ‘समाजकार्य’ करण्यासाठी आपल्याला घरदार त्यागून किंवा आपल्या आप्तजनांना दुखावून काहीही करण्याची गरज नाही. फक्त खालील गोष्टी, ज्या तुम्ही तशाही करणारच आहात, त्या थोड्या अधिक जाणीवपूर्वक कराव्यात एवढीच अपेक्षा.

चला तर मग या गोष्टी जाणीवपूर्वक करून बघू या आपणच काही बदल घडवू शकतो का...? आणि हो, तेजोत्स्वाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! तमसो मा ज्योतिर्गमय...

१. दिवाळीच्या निमित्ताने घरादाराची साफसफाई कराल तेव्हा किती ‘अडगळ’ निघते ते पहा आणि तुम्हाला या आता अनावश्यक असलेल्या वस्तू, कपडे कुणाची तरी म्लान दिवाळी उजळवू शकतात हे लक्षात असू द्या.

२. आपल्या घरासाठी आपण स्वत:च आकाशदिवा बनवा. ते शक्य नसेल आणि तयारच खरेदी करणार असाल तर तो पारंपारीक साधनांपासून बनविलेला हैंडमेड असेल असे पहा. प्लास्टिकचा, शेजारून आयात केलेला किंवा खूप वीज खाणारा निवडू नका.

३. शुभेच्छा पत्रे, भेटवस्तू या स्थानिक कलाकारांनी / उद्योजकांनी बनविलेल्या खरेदी करा. अनेक सेवाभावी संस्था, महिला बचतगट, आदिवासी संस्था, अंध अपंग व्यक्ती यांच्याशी निगडीत संस्था, खास दीपावलीच्या मुहूर्तावर अशा प्रकारचे उत्पादने तयार करीत असतात परंतु जाहिरात / मार्केटिंग करण्यासाठी त्यांच्याकडे निधी व मनुष्यबळ दोन्ही नसल्याने त्या कदाचित तुमच्यापर्यंत पोहचू शकणार नाहीत. तेव्हा थोडे कष्ट घेऊन आपल्यालाच त्यांच्यापर्यंत पोहचावे लागेल. करू या थोडी शोधाशोध?

४. दिवाळीत सीमेवरच्या जवानांसाठी फराळ पाठविण्याचे कार्य काही संस्था वर्षानुवर्षे करीत आहेत. आपण दिवाळी सुखेनैव साजरी करण्यात जवानांच्या केवढ्या मोठ्या त्यागाचा वाटा आहे याचे कृतज्ञतापूर्वक भान ठेवून, या प्रकारच्या उपक्रमात काय योगदान देता येते ते पहा. या संस्था वीरगती प्राप्त जवानांच्या कुटुंबियांची देखील काळजी घेतात. 

५. आपल्या खरेदीच्या यादीची पुन:पुन्हा पडताळणी करा आणि ज्या गोष्टी ‘गरजे’पेक्षा ‘हौशे’च्या यादीत मोडतील त्यांचा पुनर्विचार करा. उपभोक्तावाद पर्यावरणाला तेवढाच घातक आहे जेवढा भ्रष्टाचार मानवतेला! 

६. आपण दिवाळीच्या खर्चासाठी जेवढे बजेट ठरविले असेल त्याच्या किमान १०% रक्कम गरजू लोकांना मदत म्हणून द्या. हे १०% चं तुमचा आनंद १००% वाढवतील. 

७. आवाजी फटाके उडविणे टाळा, फटाके उडवायचेच असतील तर शोभेचे आणि ते देखील फक्त प्रमाणित केलेलेच उडवा.

८. सण साजरा करतांना आपला कुणालाही उपद्रव होत नाही ना, आपण कचरा / प्रदूषण करत नाही ना याची सर्वतोपरी काळजी घ्या आणि इतरांनाही याबाबत सजग करा.

९. प्रवास करणार असाल तर शक्यतो शासकीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा आणि बेकायदेशीर वाहतूक साधनांचा अवलंब टाळा आणि कुठल्याही प्रकारच्या दंडेलीस, काळाबाजारास, गैरप्रकारास थारा देवू नका.

१०. शेवटी सगळ्यात महत्वाचे म्हणजे उत्सव हे मांगल्याचे, आनंदाचे, सौख्य-समाधानाचे आणि संस्कृतीचे प्रतिकं असतात आणि त्यामुळेच ‘मानव्य’ हे त्यांच्या केन्द्री असले पाहिजे. आपल्या आप्त जनांना, घरातल्या अबाल-वृद्धांना, समजातल्या वंचित घटकांना आणी ज्यांना ज्यांना तुमची गरज आहे त्या सगळ्यांना पुरेसा ‘वेळ’ द्या. आजच्या धकाधकीच्या आणि व्हॉटसएप-फेसबुक च्या जमान्यात या सगळ्यांना तुमच्याकडून इतर कशाहीपेक्षा अधिक काही हवे असेल तर ते म्हणजे तुम्ही त्यांची घेतलेली दखल, केलेली विचारपूस, दाखवलेला जिव्हाळा आणि दिलेला ‘वेळ’!

आपल्या सोयीकरिता काही संस्थांची माहिती खाली दिली आहे. ही यादी केवळ प्रातिनिधिक व सदिच्छारूप आहे आणि प्रस्तुत लेखकाचा व या संस्थांचा कुठलाही व्यावहारिक संबंध नाही. तसेच आपण काहीही निर्णय घेण्यापूर्वी योग्य ती पडताळणी करून घ्यावी ही विनम्र विनंती वजा सूचना!

1. SWaCH office Paud Road Kothrud, Pune. Call: 9765999500
2. Cycle Recycle Project – Hemant Kale, Pune. Call: 09922446285
3. Aadhar Pratishthan Trust. Call: 020 6510 4143 Mob: 09860133100 / 09890630808 http://aadharpratishthanpune.blogspot.in/
4. More Welfare Trust – Mr. Kalidas More – 9922955533
5. Levis Store, Camp, Pune, For Goonj Call: 020-41202399 Email: mail@goonj.org
7. Poona School and Home for Blind Girls, Dahanukar Colony, Near Gandhi Bhavan, Kothrud, Pune. Call: 020 25389131 Email: pshbgirls@yahoo.in (Handmade Products for Diwali, till 26 Oct Only)
8. Niwant Andh Mukt Vikasalaya [Chocolate Factory] – 9923772375
9. Mouth and Foot Painting Artists Association Website: http://imfpa.org
10. Maitri Pune –7588288196 – Website: http://maitripune.org
11. Seva Sahayog Foundation Call: 020 24537655 E-mail: pune@sevasahayog.com
12. ‘SIRF’ Soldier’s Independent Rehabilitation Foundation. Mrs. Sumedha Chithade
Call: 9764294292
13. Shivaji Trail – Milind Kshirsagar – Call: 9422896563 Website: http://shivajitrail.org
14. Lakshya Foundation – Anuradha Prabhudesai Call: 09224298389
15. Sarhad – Sanjay Nahar Call: +91 20 24368621 Email: sanjaynahar15@gmail.com

Other Miscellaneous –

1. Arth Kranti – Towards Principled, Prosperous and Peaceful living.
2. Maharashtra State Transport Call: Toll Free: 1-800221250 Website: https://msrtcors.com
3. Infinitheism – Mhatria Ra – http://www.infinitheism.com/eleventh.html
4. ‘MAN’ – Animation by Steve Cutts – https://youtu.be/WfGMYdalClU
5. Consumerism Baby’s Shopping Frenzy – https://youtu.be/HNaCf_Fnp6E

The LEAST you can do on this Diwali is, go through all the above links at your convenience and see what DIFFERENCE you can make!

May GOD Bestow You with all the Health, Wealth and Wisdom on this Festival of Lights… Happy Diwali! 

Way to go...

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

शिकवण...!


युगे बदलली पण 'कान्हा' रासलीला
अन् दहीहंडी खेळतोच आहे...
भीमार्जुनाने संपवला तरीही अजून
'दुर्योधन' द्रौपदीला छळतोच आहे...

शक्ती अन् भक्ती च्या ज्याने केल्या लीला
हनुमानही तो दर्शनाला तळमळतो आहे...
रामच उरला नाही माणसात तरीही
दरसाल रावण मात्र जळतोच आहे...

अद्वैताची रासलीला, एकोप्याची दहीहंडी 
करून स्त्री सम्मान जाळावे आतल्या गर्वाला 
शिकवण ही रामकृष्णाची बाळगून पिंडी
घडवूया नवभारत विजयादशमीच्या पर्वाला...!

सन्मित्र दिनेश चंद्रात्रे  यांची विजयादशमी प्रित्यर्थ एक विचक्षण रचना

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

विजयोत्सव...!


अंब्याचे तोरण, सुगंधी शिंपण, रांगोळी साजरी 
विजय-पताका मिरवीते आज जेत्यांची स्वारी
अमंगलच्या जोडीने होवो ऱ्हास षडरिपूंचा 
याच शुभेच्छा मंगलमयी तेजोत्सवाच्या दारी...!

सत्याचा असत्यावर, तेजाचा तमावर,
ज्ञानाचा अज्ञानावर, मंगलाचा अमांगल्यावर,
सुष्टांचा दुष्टांवर आणि विवेकाचा विकारांवर
विजय साजरा करणाऱ्या विजयादशमीच्या तेजोमय शुभेच्छा...

तमसो मा ज्योतिर्गमय...!

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

‘राम’...!


रामायण हे केवळ एक महाकाव्य नव्हे तर ते एक तत्वचिंतन आहे जे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात शोधू शकतो...

‘रा’ म्हणजे प्रकाश आणि ‘म’ म्हणजे आतला. ‘राम’ म्हणजे आतला प्रकाश, अर्थात आपले अंतर्मन किंवा अस्तित्वाचे भान...! कसे ते पाहू या... 

'श्रीराम' हा राजा 'दशरथ' आणि राणी 'कौसल्या' यांचा जेष्ठ पुत्र. दश रथ म्हणजे ज्याच्याकडे दहा रथ आहेत. हे दहा रथ प्रतिक आहेत पाच 'ज्ञानेंद्रीये' आणि 'पंचेद्रीये' यांचे. कौसल्या म्हणजे कुशल. दहा रथांचा कुशल वापर ‘रामा’सारख्या तेजस्वी पुरुषोत्तमास जन्म देतो!

रामाचा जन्म अयोध्येत झाला. अ-योध्या म्हणजे जेथे युद्ध घडू शकत नाही. जिथे संघर्षाला, वैराला, विषादाला स्थान नसते असे मन शुद्ध असते आणि शुद्ध मनात कायम प्रकाशाचा, तेजाचा, ज्ञानाचा वास असतो!

अंतरात्मा हा ‘राम’ आहे आणि आपले मन हे ‘सीता’. श्वास किंवा प्राण जी आयुष्याची दोरी आहे तो वायुपुत्र ‘हनुमान’, विवेक हा ‘लक्ष्मण’ तर अहं हा ‘रावण’! ‘अहं’ जेव्हा ‘मना’चे हरण करतो तेव्हा ‘आत्मा’ कष्टी होतो. परंतु आत्मा स्वत:हून मनापर्यंत पोहचू शकत नाही, त्यासाठी त्याला प्राणाची गरज लागते. संपूर्ण 'विवेक'भानाने आणि 'प्राणा'च्या सहाय्याने 'आत्मा' आणि 'मन' यांचे पुनर्मिलन घडते तेव्हा 'अहं' नष्ट होतो... 

बघा तुमच्या अनुभवाशी जुळतंय का...?

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

पसारा...!


घरातील कुठल्याही कपाटाचं दार उघडलं कीछोट्या पल्ल्याच्या अनधिकृत पण (म्हणूनच?) लोकप्रिय प्रवासी गाड्यांमध्ये दाटीवाटीने बसलेल्या पैंसिंजरांनी दार उघडताच बाहेर सांडावे अशा पद्धतीने अंगावर धावून येणारी बोचकी हे 'समृद्धीचं लक्षण मानायचंसंग्रही वृत्तीचं की गलथानपणाचं?' या विषयी प्रत्येकाचे स्वतंत्र मत असणे स्वाभाविकच. पुण्यात तर ती वास्तव्याची पूर्वअटच असते... ओसंडून वाहणारी कपाटे नव्हेस्वतंत्र मत असणे आणि ते कुठलाही विधिनिषेध न बाळगता जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आणि चौकी चौकी ('चार रस्त्यांच्या छेदनबिंदूवरया अर्थानेगैरसमज नसावा!) उच्चरवात व्यक्त करणे! या विषयावर पीएचडी देखील करण्यास एखादा बाजीराव पुणेकर सरसावणारच नाही असे नाही. नाहीतरी अलीकडे वर्तमानपत्रांच्या सौजन्याने 'आपण यांना पाहिलंत का?', 'यंदा कर्तव्य आहेकिंवा 'निधन वार्तायांच्या तोडीस तोड, अंनत आणि अतर्क्य विषयात पीएचडी मिळविलेल्या महाभागांच्या सस्मित मुखकमलाचे रोज घरबसल्या दर्शन होते आणि सकाळ उजळून निघते. अन्यथा एवढ्या प्रकांडपंडितांना एकत्र बघण्याचा योग यायला सिंहस्थाचीच वाट बघायला लागायची! आता हे सारे विद्वान राष्ट्रउभारणीतसम्यक विकासात किंवा गेलाबाजार सोसायटीच्या गणेशोत्सवात काय योगदान देतात असले टवाळखोर प्रश्न ज्यांच्या डोक्यात येतात त्यांना ‘तुह्यी यत्ता कंची?’ असे विचारून मोकळे व्हावे. नाहीतरी अशा विवेकाची मिजास दाखविणाऱ्या अनाठायी प्रश्नकर्त्या मुक्तात्म्यांचे काय करायचे असते याचे 'प्रयोगातून विज्ञानअलीकडे सप्रात्यक्षिक शिकवण्याचे असिधारा व्रत महाराष्ट्रातील काही समाजसुधारकांनी घेऊन 'स्वच्छ भारत' साधना निरंतर चालवली आहेचतेव्हा अशा उन्मत्त विवेकखोरांकडे फार लक्ष द्यायचे कारण नाही. मुद्दा काय तर कपाट... नव्हेओसंडून वाहणारे कपाट! 

'लागेल कधीतरीच्या अत्यंत व्यवहार्य कारणांपासून सुरु होणारीकुठलीही वस्तूच काय चिंधीही टाकून न देण्याची वकिली, 'माझ्या मावशीने स्वतः:च्या हाताने बनवून माझ्या रुखवतात दिली होतीअशा भावनिक वळणांवरून अगदी, 'शेवटी सारचं नश्वर आहे म्हणून कुणी जगणं सोडतं का?' च्या तत्वचिंतनाशी सलगी करते पण ती चिंधी असंख्य प्रमोशन-डिमोशन पचवूनही रिटायरमेंटमध्ये जात नाही. 'नवे ते हवेआणि 'जुने सोडवत नाही'च्या संयोगातून कपाटे फुगत राहतात आणि अगदीच टेकीला येऊन ‘आत्ता प्रसवतील’ अशी झाली की नवीन कपाटाचा कपटी प्रस्ताव येतो. नवीन कपाटाला जागा नसेल तर ' मोठ्ठ घर घ्या कधीतरीने सुरु होऊन ‘किती चांगली स्थळ आली होती मला’ आळवणरा राग 'माझं मेलीचं नशिबचं फुटकं 'च्या समेवर येईतो नामधारी 'कर्त्यापुरुषाचा पार ‘जोगिया’ झालेला असतो. याची देही याची डोळा सदेह विरक्ती म्हणजे काय याचा तो जिताजागता नमुना मग निमूट नवीन कपाटाच्या तयारीला लागतो आणि आपल्या घराण्याचा उद्धार टाळण्याचा पुन्हा एकदा केविलवाणा प्रयत्न करतो.

या सगळ्याला पुरून उरणारा (अक्षरश:) पुरुष हा खरा पुरुषोत्तम! अरेवानरसेनेच्या मदतीने समुद्रात सेतू बांधणं काय अवघड आहेआमचे कित्येक राजकारणी तर त्यांच्या चमत्कारी कंत्राटदारांच्या हातून अदृश्य पूल रातोरात बनवू शकतात किंवा असलेला रस्ता हातोहात अदृश्य करू शकतात. त्या वनवासी रामाला म्हणावं बायकोला हवी असलेली हरेक वस्तू मिळवण्याचासांभाळण्याचा आणि प्रत्येकवेळी तिचे (वस्तूचे; बायकोचे अनुस्यूत असते हे ज्याला समजत नाही तो मुदलात लग्न करण्यास नालायक ठरावा!) मनापासून कौतुक करण्याचे शिवधनुष्य उचलून दाखव तर तू खरा पुरुषोत्तम! नुसत्या कांचनमृगाने काय होते, इथे साक्षात इंद्राला ‘हा ऐरावत जरा अशक्त आणि फिकाच वाटतोय, यातला जरा गुटगुटीत आणि गोल्डन फिनिशमध्ये आहे का हो?’ विचारून आधीच डळमळीत असणाऱ्या त्याच्या आसनावरून साफ भुईसपाट करण्याचे सामर्थ्य बाळगणाऱ्या आमच्या रणरागीणींची एक हौस भागवून दाखव म्हणावं! आख्ख्या तुळशीबागेची संभावना ज्यांना ‘छे बाई, इथे काही व्हरायटीच नाही!’ इतक्या सहजतेने करता येते त्या महिलावर्गास वनवैभवाची काय पत्रास? यांच्या शॉपिंगने नाही तुला ‘राम’ म्हणायला लावले तर पैसे परत!

असो, तूर्तास मुद्दा असामान्य महिला शक्ती किंवा त्यांचे असाधारण तोलमोल कौशल्य हा नसून त्यांनी ज्या गरीब बिचाऱ्या दुकानदारांवर मेहरबानी करून वस्तू स्वरुपात जे काही स्वीकारले आहे त्याच्या जपणुकीसाठी, सतत पाळणा हलता ठेवणे ही आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता समजणाऱ्या कुटुंबातली बाई जशी कायम ‘बाळसेदार’ भासते, तसे ‘कायम गर्भार असणाऱ्या कपाटांचे एकूणच आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अभिसरणातील स्थान’ असा आहे. चर्चा कितीही फुटकळ आणि अतार्किक असली तरी नाव भारदस्त असलं की ती आपोआपच बौद्धिक व वैचारिक ठरते असे गुह्यज्ञान, वर्षभरात चौथ्या चैनलशी लगीन लावलेल्या माझ्या एका सुप्रसिद्ध दूरदर्शन सूत्रसंचालक मित्राने मला अलीकडेच दिले. त्याचे नाव खोटे असले तरी तो सांगतोय ते खरे असावे! तर ही असली कपाटे नेमके कशाचे निदर्शक आहे आणि या समस्येवर (कुणाच्या?) कायमस्वरूपी तोडगा काय अशा विचारमंथनातून हाती आलेले हलाहल नदीत सोडून तिथे आधीच गुदमरणाऱ्या असंख्य पीओपी बाप्पांना 'निळकंठ' करण्याचे पातक नको म्हणून हे मुक्त चिंतन!

ज्या वस्तू गेल्या सहा महिन्यात लागल्या नाहीत त्या इतर संग्रहणीय ठिकाणी (पक्षी: पोटचा माळा किंवा बेडचे पोट) हलविणे; वर्षभरात न लागलेल्या गोष्टींचे ऑडीट करणे आणि त्याहून अधिक काळ अस्पर्श राहिलेल्या वस्तूंना मुक्ती देणे एवढी साधी, सोपी आणि ‘वस्तुनिष्ठ’ त्रिसूत्री बरीच अडगळ हातावेगळी करू शकते. मोकळ्या झालेल्या जागेत सोईस्कर मांडणी करून अनेक गोष्टींना मोकळी हवा लागू शकते. हं, आता प्रत्येक गोष्टीत ‘एव्हढ सोपं नसत ते!’ असाच पवित्रा घेतला तर कुठल्याच पसाऱ्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. आणि जुन्या कालबाह्य आणि म्हणून निरुपयोगी गोष्टी टाकून देण्याचं धैर्य दाखवलं नाही तर मोकळा श्वास घ्यायला नवीन सुखांना जागाच मिळणार नाही. शेवटी अडगळ आणि पसारा हा फक्त कपाटातच असतो अस थोडीच आहे? आठवणी, तर्कटं आणि विषाद मनात कमी पसारा करत नाहीत. क्षण, संदर्भ आणि नाती जतन करून वाढत नाहीत आणि टाकून देवू म्हणून तुटत नाहीत. तिथे आईच्या ममत्वाची नित्य आणि निरपेक्ष पखरणच हवी. 'जोपासना' शब्दात जेवढी 'उपासना' अनुस्यूत आहे तेवढेच 'तपस्या' शब्दात 'तप'... सहानुभूती मधली अनुभूती ‘सह’ शिवाय भूतदया ठरून करुणेच्या यादीत मोडते आणि ‘भावने’त ‘सत्’ नसेल तर 'सद्भावना' हा फक्त उपचार ठरतो.

गौरी सासरी गेल्या, गणपती अद्याप विराजमान आहेत आणि नवरात्र तोंडावर आलेय. मग? करू या एकदा आवराआवर आणि बघू या किती प्रसन्न वाटत ते...? चला लागा कामाला! तेव्हढेच आपलेही 'स्वच्छ भारत' अभियानाला योगदान, काय...?!!

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

श्रीगणपतिस्तोत्रं


प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

भीनी भीनी भोर...!



भीनी भीनी भोर...
बर्‍याच दिवसांनी ऐकल...
योग्य वेळेस पाठवलस आणि ऐकता आलं.
सकाळी आठ च्या सुमारास.
सुरवातीचा पक्ष्यांचा, गायींचा आवाज, एकदम सुरात.
ते संपता संपता तानपुरा अस्पष्ट पणे वाजायला सुरवात होतेे...
षड्ज व मंद्र पंचम; वातावरण निर्मिती होते.
स्वरमंडल टाइप वाद्य त्यात अजून सुर भरतं, बर्फाच्या गोळ्यावर गोड लाल सरबत छिडकल्यासारखं!
संतूरचा फक्त भास होण्या इतपतच वापर.
...आणि आशाताईंचा षड्ज अवतरतो....
त्याबद्दल लिहाव तितकं थोडं!
मंद्र सप्तकातल्या निषादावर हलका स्पर्श करत, कोमल धैवता पर्यंत जाऊन वर कोमल रिषभ,गंधार व तीव्र मध्यम दाखवत तोडी रागाचं रूप दाखवत आशाताई पुढे सरकतात.
भीनी उच्चारताना सा पं पंपं अशा रीतीने पंचम घेऊन मियाँ की तोडी कन्फर्म करतात.
मग पुढे काय होतं ते नुसत ऐकावं!
साथीला फ्लूट, सितार, वायोलीन आदिंची रेलचेल.
मधे सरगम घेताना मात्र आशाताईंनी पंचम टाळलाय...
जरासी शरारत...
इति!

[व्हॉटसप मेसेज]

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

तह...!


सोहळे त्यांच्या दांभिकतेचे
इथे नित्य पाहतो मी...
अन मानभावी वर्षावात
शुष्क राहूनी, नाहतो मी...!

प्रवाही क्षणांच्या बेधुंद वेगात
थिजून खळाळत वाहतो मी...
श्वासही जड होता इथे,
विश्वाचा भार वाहतो मी...!

पतीत मी अन पराक्रमीही
युद्धात जिंकूनी तह साहतो मी...
श्रोत्याच्या प्रच्छन्न अभावात
निमूट मौनात राहतो मी...!

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

गीतार्थ...!


महाभारताचे एक विचक्षण निरूपण

उपोदघात: महाभारताच्या १८ दिवसांच्या युद्धात, त्या मानव वसाहतीमधील सुमारे ८० प्रतिशत पुरूष योद्ध्यांची हानी झाली अशी नोंद इतिहासात आहे

महाभारताचे धर्मयुद्ध संपले आणि ते जेथे घडले त्या कुरूक्षेत्रावर संजय पोहचला. महाभारत समजून घेण्यासाठी तेथे पोहचणे आवश्यक होते हे तो जाणून होता. संजयने सभोवार नजर फिरविली आणि विचार केला, 'महाभारत खरोखरीच घडले असेल? माझ्या पावलांखाली जी जमीन आहे तिने एवढा रक्तपात शोषला असेल? रणवीर पांडव आणि त्यांचा मितवा श्रीकृष्ण या ठिकाणी ऊभा असेल जिथे मी ऊभा आहे?' 

'त्याचे सत्य तुला कधीही उमजणार नाही...' एक वृद्ध आणि मृदू आवाज आला

संजय वळला आणि पाहतो तो काय, केशरी आवरणात लपेटलेली एक वृद्ध आकृती धुळीच्या लोटातून प्रकटली

'मला कल्पना आहे तू येथे कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धाबद्दल जाणून घेण्यासाठी आला आहेस, पण तू त्या युद्धाबद्दल तोपर्यंत जाणून घेऊ शकत नाहीस जोपर्यंत तुला खऱ्या युद्धाची कल्पना नाही!' म्हातारा गूढरम्य पद्धतीने बोलला

'आपल्याला काय म्हणायचे आहे...?' संजयला क्षणार्धात उमगले की तो अशा व्यक्तीच्या सान्निध्यात आहे जो इतर कुणाही जीवित व्यक्तीपेक्षा या युद्धाबद्दल अधिक जाणतो

'महाभारत हे एक महाकाव्य असेल, एखादी दंतकथा किंवा कदाचित इतिहास देखील परंतु ते एक तत्वज्ञान खचितच आहे.' वृद्धाच्या हलक्याशा स्मितोद्गाराने संजयची जिज्ञासा पुरेशी चाळवली.

'तसे असेल तर आपण मला ते तत्वज्ञान ऐकवाल?' संजयने विनवणी केली

'जरूर! ऐक तर...' म्हातारा पुढे बोलू लागला. 'पांडव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माणसाची पंचेंद्रिये - दृष्टी, गंध, रुची, स्पर्श आणि ध्वनी आणि कौरव म्हणजे कोण माहितेय...?' डोळे बारीक करून म्हातारा विचारता झाला. संजयने नकारार्थी मान हलवली

'कौरव म्हणजे माणसाच्या ज्ञानेंद्रियांना नित्य प्रलोभनात पडणारे, षडरिपूजन्य शंभर विकार! पण माणूस त्यांच्याशी लढू शकतो, विचार बरे कसा?' संजयने पुन्हा एकदा नकारार्थी मान डोलवली

'जेव्हा तो निळा सावळा कृष्ण कन्हैय्या तुमचा सारथी असतो.' हे सांगतांना वृद्धाचा चेहरा स्मितहास्याने उजळला आणि संजयला जणू गूढज्ञान झाले.

'कृष्ण हा तुझ्या आतला आवाज आहे, तुझा आत्मा आहे, तुझा पथप्रदर्शक विवेक आहे आणि तू तुझे आयुष्य त्याच्या हाती सोपविलेस की तू चिंतामुक्त होतोस.' 

अर्जुनासारखाच दिग्मूढ झालेला संजय अचानक काही सुचून विचारता झाला, 'असे असेल तर द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म विकारी कौरवांच्या बाजूने का लढतात?' 

संजयच्या मर्मग्राही शंकेने कष्टी होऊन म्हातारा मान हलवीत उत्तरला, 'त्याचा अर्थ असा की जसजसे माणसाचे वय वाढते आणि जगण्याचे भान विस्तृत होत जाते तसतसे त्याचे आपल्या वडीलमाणसांबद्दलचे समज बदलत जातात. वाढत्या वयात आपण ज्या वडीलधाऱ्यांना आदर्श मानत होतो ते तेवढे आदर्श नसतात हे उमजू लागते. त्यांच्यातही उणिवा असतात, मर्यादा असतात. आणि एके दिवशी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की ते तुमच्या भल्यासाठी आहेत की अध:पतनासाठी. त्यावेळी तुम्हाला कदाचित अशीही उपरती होऊ शकते की तुम्हाला जे योग्य आहे आणि सत्य आहे त्यासाठी त्यांच्याशीच लढणे क्रमप्राप्त आहे. आयुष्याच्या वाटेवर जगण्याचा अर्थ जाणून घेतांना भेटणारे हे सगळ्यात अवघड वळण असते आणि म्हणूनच गीता आवश्यक आहे.' 

संजय गलितगात्र होऊन जमिनीवर कोसळला, थकून नव्हे तर म्हातारबुवांनी सांगितलेल्या तत्वातील विषाद त्याच्या अंतर्मनाला भिडल्याने. शरीरातील सर्व त्राण एकवटून तो पुटपुटला, 'आणि कर्णाचे काय?' 

'अरेच्चा, तू सगळ्यात गहन ते शेवटासाठी राखून ठेवलेस की!' म्हातारा सांगू लागला

'कर्ण हा तुझ्या जाणिवांचा सहोदरच नव्हे का? कर्ण म्हणजेच तुझ्या इच्छा, कामना, आकांक्षा. तुझ्या अस्तितवाचा अविभक्त भाग असूनही तो विकारांच्या बाजूने उभा राहतो. त्याला सतत उपेक्षीत वाटते आणि त्याचे परिमार्जन तो विकारांची सोबत करण्यासाठी निरनिराळ्या सबबी देऊन करतो, अगदी तुझ्या वासना नेहमीच करतात तसे. विकारांच्या अधीन होण्यासाठी तुझे मोह तुला भाग पडतातच की नाही?'

संजयने हलकेच मान हलवली... यावेळी होकारार्थी! संजय सर्व गोष्टींची संगती लावत अत्यंत विचारमग्न होऊन अधोवदन बसून होता आणि त्याने जेव्हा मान उचलून वर पाहिले तेव्हा ती वृद्ध आकृती अंतर्धान पावली होती... त्याच धुळीच्या लोटामध्ये... जगण्याचे एक विलक्षण भान मागे ठेवून!

- मुक्त चिंतन