सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

तर्कट...!

 

भविष्याच्या विस्तीर्ण पंखांना 
खेचते मागे भूत…
न-भूतो-न-भविष्यती तर्कांनी
कापते गळा सूत…!

रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

धांडोळा...!

 

वारे असे भणाणले की
तारू भरकटले असते…
धुके असे दाटले की
रस्ते धुरकटले असते…

भोके अशी पडली की
इतुकेही साठले नसते…
धारेस भलत्या लागता
किनारेही गाठले नसते…

जगण्याची मौज अशी
हसू आसवांना फसते
मागे वळून पाहता
नियती नशिबाला हसते…!

शनिवार, २७ सप्टेंबर, २०१४

भग्न...!

 

आदी पासून अंतापर्यंत
पिंड माझा देह-ग्रस्त
जन्मोजन्मीच्या खुणांनी
जाणीव भग्न,भान त्रस्त…!

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

वरदा…!

 

अम्बा-माया-दुर्गा-गौरी
आदिशक्ती तूच शारदा
सकल मंगल तुझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी तू वरदा…! 

घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…!

बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

पार्थिव ...!

 

अस्वस्थ जाणिवांचे प्रहर अन
विश्रब्ध उमाळ्यांच्या रात्री
जगण्याच्या जात्यात भरडतो 
पार्थिव आनंद यात्री…!

आज हृदय मम...!


"अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठुन मीलन
जीव भुकेला हा तुजवाचुन
जन्मांमधूनी पिसाट फिरता,
भेट घडे आजला...!" 

कविवर्य शंकर वैद्य यांना भावपूर्ण आदरांजली!

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

असे काही...!

 

सापडते का पहावे म्हणतो
झोकून द्यावे असे काही
वाटचाल तर भागच आहे
जरी पावलांना ठसे नाही…!

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०१४

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

कापूर...!

 

जगण्याचे मर्म उमजण्या
आयुष्य जावे लागले…
असण्याचे सार्थक होण्या
मज कापूर व्हावे लागले…!

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०१४

'देणे समाजाचे'...!


"करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची,
 रणात आहेत झुंजणारे अजून काही
 विझून माझी चिता युगे लोटली तरीही
 विझायचे राहिले निखारे अजून काही…!"

- कविवर्य सुरेश भट 

'देणे समाजाचे' या समाजाभिमुख कार्यक्रमाच्या १० व्या पर्वाचा शुभारंभ करतांना
व्रतस्थ अनिल अवचट तथा बाबांना वरील काव्यपंक्ती स्मरल्या…!

बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

विराट...!

 

आळवितो रोज किती
मी, मला अन माझे…
विराट निसर्ग-भानात
क्षुद्र जगण्याचे ओझे…!

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

शानसे...!

"मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूं
मगर चांद तारे मुझे जानते है… 
ये सारे नजारे मुझे जानते है…!"


आशाताई, वाढदिवसाच्या कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा…! 
हा आवाज जन्मोजन्मी आमच्या हुरहुरत्या मनावर फुंकर घालो…!

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४

जयोस्तुते…!

 

अक्षर-ओळख, गणित, शास्त्र
भूगोलाच्या इतिहासात नेऊन
घडविले आम्हा जगण्यालायक
असिधाराव्रताचा वसा घेऊन…
 


तुमच्या शिवाय गोळे होतो
जगलो असतो मेंढर होऊन
शिकवून आम्हां केले माणूस
स्वत: उन-पावसात न्हाऊन…!
 

कसे फेडावे ऋण जन्माचे
आम्ही दिगंतरा जाऊन
कुठेही असलो तरी जगतो
हरघडी तुमचे गीत गाऊन…!