बुधवार, २९ जानेवारी, २०१४

अंकुर...!

 
नेमस्तपणे सहावे 
शल्यही जपावे
सुचेल ते लिहावे
श्वासातून…

स्नेह्यांस भेटावे
हितगूज करावे
सक्तीने सुटावे
भासातून…

सर्व'स्व' होता
घडा होतो रिता
क्षणिक सुटका
पाशातून…

लयाचा क्षण
मुक्तीचे भान
नवनिर्माण
नाशातून…!

रविवार, २६ जानेवारी, २०१४

प्रजा-पासष्टी…!

 
प्रजेला लाभावी प्रज्ञा
 
विवेकाचे यावे राज्य
 
फोफावल्या वृक्षाला
 
मूळ होते का त्याज्य…?

गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

मर्म...!


वाटेत भेटल्या हरेक चकव्याने

दिले भान गुंतून सुटण्याचे

जाळ्यालाच उमगले जणू

मर्म माशाच्या घुसमटण्याचे…!

गुरुवार, १६ जानेवारी, २०१४

हाकारे...!


जगण्यास तुमच्या
हवा अर्थ जो साकारे
शर्थ जगण्याची पण
जिंदगी जगणे नाकारे…

गोठलेल्या भावनांना
पेटवाया हवे निखारे
तरतील कसे हे ओंडके
जेव्हा दूर सर्व किनारे…

भरकटल्या सावजा
भिवविती हाकारे
शिकाऱ्याच्या हेतूंना
भुलू नका पुन्हा रे…!

बुधवार, १५ जानेवारी, २०१४

विराणी…!


शब्दात न मांडावे तर
काळीज कुचंबते
यावे ओठावर शब्द
अन जीभ जळजळते…

ऐकून माझे गाणे
पेटून न उठो कुणी
म्हणून दडवली मी
ओठी जुनी विराणी…!

मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

उत्तरायण...!


परिवर्तनाची नांदी
बध्द शृंखला तोडी
तेजाच्या संक्रमणाला
तीळगुळाची गोडी…!

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

व्रण...!

 

काळ बदलला म्हणता
वेळ जाता जात नाही…
रोज भरूनही उरल्या
व्रणातून वेदना वाही…!

शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

खूळ...!


एका पैशाची भाकरी
एका पैशाचे खूळ
भाकरीसाठी चाकरी
खूळ जगण्याचे मूळ…!

शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

अनुबंध…!


सदिच्छेच्या फुलांना
दुराव्याचा गंध
भेटीने होतात
दृढ अनुबंध…!

सन्मित्र संजयला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

गुरुवार, २ जानेवारी, २०१४

नवपर्व...!


धाणल्या सागराच्या
निवल्या बऱ्याच लाटा
खुणावती नवी क्षितिजे
मोहविती नव्या वाटा…

आशेला पूर नवा
स्वप्नांना रंग नवे
आभाळ गाठण्यास
पंखांना बळ हवे…

हर्ष खेद सांभाळीत
सरले आणि एक वर्ष
उन्नतीच्या जोडीने होवो
जगण्याला जाणीवेचा स्पर्श…

नवपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा…!