बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

'भाव'...!


सूर टिपेचा आवेश 'फोडो'

'साधने'ची छबी छानसी...

'देव' नावाचा कर्कश  टाहो

'भाव' भलताच मनी मानसी...! 

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

शिकस्त...!


अंतर्मनात संदिग्धता मात्र

प्रकट अविर्भाव नेमस्त...

जळीस्थळी काष्ठीपाषाणी

सुखाच्या शोधाची शिकस्त...!

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

न-व्यास...!


माणुसकीचा इतिहास रक्तरंजित झाला

जगाचा भूगोल बदलण्याच्या हव्यासात

वाल्मिकीला वाल्याच व्हावे लागेल

त्रीज्यांच्या युतीने बनलेल्या न-व्यासात...!

रविवार, २७ नोव्हेंबर, २०११

विश्वेश्वर...!


व्यथेलाही आवाज असतो

नक्कीच असतो नाद-स्वर

उमजण्याकरिता मात्र तो

ध्यानीमनी हवा विश्वेश्वर...!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

निशां...?


शहीदौंकी चिताओंपर

लगेंगे हर बरस मेले

वतनपें मिटनेवालौंका

यहिं बाकी निशां  होगा...?

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

नांदी...!


भ्रष्ट-पुष्ट कोडगे ने-ते

उद्विग्न अराजकाची नांदी...

अविवेकी बेताल माध्यमे

कानकोंडे दुसरे 'गांधी'...!

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

भक्ती...!


भोळ्या भक्ताच्या भावाला

गरज नाही सक्तीची...

संधीसाधूंच्या सोंगाला

ओळख नाही भक्तीची...!

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

बेसूर...!


अधीर अन आतुर

लुब्ध अन चतुर

कशी जमावी मैफल

सूर-न-सूर बेसूर...!

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

अभोगी...!


हे असेच आहे काही

अभोगी आयुष्य माझे

नसण्याचे दु:ख रिकामे

असण्याचे सुंदर ओझे...!
कवयत्री...?

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

मर्त्य ...!


काही काळ तरी जगावे

नि:संदर्भ अन निर्हेतुक

अमूर्त या चिरंतनात

मर्त्य जीव आगंतुक...!

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

क्षण...!


आला क्षण गेला क्षण

जगला क्षण तगला क्षण

भूत-भविष्याने भंजाळलेली

वर्तमानाची वांझोटी वणवण...!

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

अहं...!


उर्मी अन बेभान मदहोशी

की गरज, उरक अन उपचार

'त्री'रीपुंच्या मायाजालात

स्खलन'शील' अहं लाचार...!

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

विशुद्ध...!



निरागस बाल्य-निर्हेतुक हास्य

उदंड विश्वास अन कोवळी स्वप्ने

आकांक्षेला मिळो विवेकी दृढता

जतन होवो निर्मल-विशुद्ध मने...!

रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

खूळ...!


निखळ नि:स्पृहतेला

प्रसिद्धीचे खूळ 

उन्नतीच्या पोटी

दांभिकतेचा शूळ...!

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

उन्मनी...!


तुझ्या असण्यात तुझ्या नसण्यात

तुझ्या हसण्यात तुझ्या रुसण्यात...

धुंद मनपाखरू उडे रानीवनी

तुझ्या उन्मनी बरसण्यात...!

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

प्रश्न...!


आताशा बुडणा-या सूर्याला

'बराय उद्या भेटू...'

असे म्हणालो कि तो मला म्हणतो,

'कशावरून?

मधल्या रात्रीची तुला अजूनही इतकी खात्री आहे?'

सूर्य आता म्हातारा झालाय...!

- एकमेवाद्वितीय पुल अन्य कोण...?

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

चोच...!


भ्रमिष्ट वैराग्याला

आसक्तीची बोच

स्वयंभू पिंडाला

षडरिपुंची चोच...!

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

अविभक्त...!


नामाचा गजर
इंद्रायणीकाठी
संतांची मांदियाळी 
भावसंपृक्त...I

सुंदर ते ध्यान 
कटीवर हात 
उभा विटेवर 
अविभक्त...II

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११

पहारा...!


अलवार सुखाची धुंदी

अन चित्तवृत्तींचा शहारा...

उत्तररात्री ग्लानीत मुग्ध

निजेवर भ्रमाचा पहारा...!

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

खेळ-खंडोबा...!


खेळात म्हणे चालायचेच,

'नवा गडी नवा राज'...

संदर्भ सोयीस्कर नवे

खेळ-खंडोबा सगळा आज...!

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

लक्षण...!?!


अनीतीने द्रव्य जोडी,

धर्म नीती न्याय सोडी,

संगतीचे मनुष्य तोडी,

तो येक मूर्ख
- समर्थ रामदास 

बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

स्नेहमिलन...!


नेहमीच घडो स्नेहमिलन ज्यात

भेटीचे सुख तरी हरविल्याची खंत

उल्हास, रोमांच आणि भावनावेग

उत्कट या क्षणांसाठी पुन्हा मिळो उसंत...!