शुक्रवार, २९ जुलै, २०११

डूब...!



संध्याकाळची वेळ अन

तुझ्या कुशीची उब...

क्षितिज नारंगी करणारी

सूर्याची ती डूब...!

गुरुवार, २८ जुलै, २०११

सौदा...!


मनाच एक बर असतं

त्याला व्यवहार कळत नाही

सगळा भावनांचा व्यापार

सौदा कधी छळत नाही...!

बुधवार, २७ जुलै, २०११

रीत...!


जगण्याची इथल्या किती

बदललीय रीत...

जिवंत कोंबडही  आता

आगीला नाही भीत...!

सोमवार, २५ जुलै, २०११

शर्यत...!


पुढच्यास ठेच मागचा शहाणा

अशी म्हणे म्हणं आहे...

तरी पडलेल्याला तुडवून पुढे

धावण्याच्या शर्यतीत प्रत्येकजण आहे...!

गुरुवार, २१ जुलै, २०११

वळण...!


थांबणे म्हणजे संपणे नव्हे

कधीकधी ते वळण असते...

तुटलेले प्रत्येक लाकूड

नेहमीच काही जळण नसते...!

बुधवार, २० जुलै, २०११

वास्तव...!


स्वप्नातल्या गावांना

आठवणींच्या वाटा...

'मना'च्या कल्पनांना

वास्तवाचा फाटा...!

मंगळवार, १९ जुलै, २०११

अंतर...!


जीवन आणी मृत्यूत

तस फारसं अंतर नसतं...

दरम्यान जे जे घडतं

ते फक्त जर-तर असतं...!

सोमवार, १८ जुलै, २०११

उपचार...!


प्रश्न करणं हा कळवळा नाही

शिष्टाचार आहे...

उत्तर शोधणं ही इच्छा नाही

उपचार आहे...!

शुक्रवार, १५ जुलै, २०११

पोरकं...!


अनुभवच फक्त शिकवतो

आपलं आणी परकं...

यशाचे धनी सगळेच

अपयश नेहमीच पोरकं...!

मंगळवार, १२ जुलै, २०११

हातोहात...!


दररोज आयुष्य मला

काहीतरी शिकवीत असत...

थोडस देवून बरचस काढून घेतांना

हातोहात फसवत असत...!

सोमवार, ११ जुलै, २०११

उगाचच...!


जीवन आणी मरण, एकाच नाण्याच्या

दोन बाजू आहेत म्हणतात...

जगतांना मेल्याचा अन मेल्यावर

जगण्याचा उगाचच आव आणतात...!

रविवार, १० जुलै, २०११

मर्म...!


आपला स्वार्थ जपणे

इथल्या प्रत्येकाचा धर्म आहे...

मी - माझे - मला

एव्हढेच यांच्या जगण्याचे मर्म आहे...!

बुधवार, ६ जुलै, २०११

समर्पण...!


हुतात्म्यांची नावं रस्त्यांना देण्यात

न जाणो कोणती भावना आहे...

त्यांच्या रस्त्याने जातो म्हणणे

ही समर्पणाची शुद्ध संभावना आहे...!

मंगळवार, ५ जुलै, २०११

घर...!


घर हे स्वप्नरंजन नव्हे

तर एक संकल्पना असते...

मांडली तर भातुकली,

विस्कटली तर वल्गना असते...!

रविवार, ३ जुलै, २०११

अमावस्या...!?!


एकटेपणाची परिसीमा

त्या दिवशी घडली...

अमावस्या आली म्हणून

रात्र माझ्यासवे रडली...!

शुक्रवार, १ जुलै, २०११

अनुनय...!?!


साथ हा शब्द

खरा मजेदार आहे...

मागितली तर अनुनय,

मिळाली तर बहार आहे...!