रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

हरकत..!

व्हॉटसएपवर शेअर झालेल्या या विचक्षण परंतु निनावी कवितेचा रचयिता कोण याचा शोध लागला नाही. युगानुयुगांच्या पुरुषी दांभिकतेवर नेमका प्रहार करणाऱ्या या आशयगर्भ प्रकटनाच्या स्वामित्वाची कुणाला काही कल्पना असल्यास कृपया माहिती द्यावी. विशेष काही नाही, आभार मानायचे आहेत आणि आम्ही आम्हाला समर्पक वाटलेल्या नामकरणासह आमच्या ब्लॉगवर शेअर करण्यास कर्त्याची काही 'हरकत' नाही ना एवढी खात्री हवी आहे. या रचनेने पुन्हा एकदा 'वाचे बरवे कवित्व...'ची प्रचिती आली, बाकी काय...! 


मी विसळत होते उष्टी भांडी..
जेव्हा तू बोलत होतास, 
परिसंवादात 'स्त्री'च्या श्रमप्रतिष्ठेवर..
कुण्या एकीच्या तरी कष्टाची होईल किंमत म्हणून म्हंटल, 
"हरकत नाही"

मला रडवत होता तुझा अबोला,
जेव्हा प्रकाशित होतं होत 
'स्त्री-पुरुष संवादावर'तुझं पुस्तक..
कुणा एका नात्यात तरी बोलका होईल वाद म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

मला वेध लागले होते शृंगाराचे,
जेव्हा तू देत होतास बौद्धिक
'स्त्रीच्या भावनांची'व्हावी कदर..
कुण्यातरी 'ती'च्या तरी नजरेला मिळेल होकार म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

धूळ खात होत्या माझ्या पदव्या,
जेव्हा तू अभिमानाने वाचली बातमी 
'अर्थशास्त्रातल्या स्त्री'च्या योगदानाची..
एकीच्यातरी प्रमाणपत्राला मिळेल रोजगार म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

मी घेतंच होते गोळ्यांवर गोळ्या,
जेव्हा तू आग्रही राहिलास
तुझ्या बहिणीने दोघींवरच थांबावं..
त्यांच्या तरी वाट्याला येऊ नये माझ्या कळा म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

मी घरात होत गेले बंदिस्त,
जेव्हा तू झगडत राहिलास
'स्त्री मुक्ती'साठी..
एखादी तरी होईल भोगण्यातून मोकळी म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

एकदा बिचकून पाहिलं शेजारच्या घरातल्या कोपऱ्यात,
तर ती ही काढतच होती उष्टी..
तीच्याही हाकेला नव्हती साद..
तीच ही राहून गेलं होतं लाजणं..
तिची ही अधुरी होती स्वप्नं..
तिचे ही होतंच होते गर्भपात..
ती ही तितकीच होती जखडलेली..

हादरले मी..
अन धावतच जाऊन पाहिलं प्रत्येक शहराच्या चौकात,
तर तो ही म्हणत होता ,
हवी स्री-श्रमाला प्रतिष्ठा..
हवी स्त्रीपुरुषात निखळ मैत्री..
हवी स्त्री भावनांची कदर..
हवी अग्रस्थानी स्त्री..
हवी स्त्रीला निर्णयशक्ती..
हवी स्त्री मुक्तच..

सगळीकडे 'फक्त' तोच बोलत होता..
तो 'फक्त'च बोलत होता...

आता मात्र मला  "हरकत आहे"...!

#वास्तविकआयुष्याचीकाल्पनिककथा

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

ध्रुव हालतो...?नीतीचा भोक्ता, मनाचा सच्चा आणि शब्दाचा पक्का माणूस आपले परखड मत कधीही, कुठेही आणि कसेही व्यक्त करण्यास मुळीच कचरत नाही... ते स्वत:बद्दलचे आणि अव्यवहार्य ठरू शकणारे असले तरी! आत्मभान ही मानवी अस्तित्वाची उन्नत पायरी असली, आत्मस्तुती किंवा आत्मवंचना ही आत्मचरित्राचीच ‘स्वान्त सुखाय’ पाने असली आणि उदासीन आत्मपरीक्षण आणि त्याच्या साक्षेपी विश्लेषणाचे काव्यात्म प्रकटीकरण हे प्रसंगी आत्ममग्नतेचे लक्षण वाटले तरी ते अनुभूतीचे भावविश्व जेव्हा वैयक्तिक न राहता वैश्विक होत समस्त मानवांना सामावून घेते तेव्हा त्याचे बदलले परिमाण केवळ एका घायाळ पराभवाचा विषाद न उरता ‘विश्वाचे आर्त’ मांडणारा निषाद ठरतो! अगदी कोवळ्या वयात अशा अथांगतेचे सार उमजण्यास ज्ञानेश्वर जन्मावा लागतो आणि ‘अगदी माझ्याच मनीचे बोल हे...’ असे सर्वसामान्यांस वाटायला लावणारा भाव शब्दात बांधण्यास तो कवि करंदीकर असावा लागतो...

विंदांच्या माझ्या हृदयस्थ कवितांमध्ये मानाचे स्थान असलेली जातक मधील ही आर्त गझल...?

मी ऐकले ध्रुव हालतो

मी ऐकले ध्रुव हालतो, त्याचे काही वाटले;
माझेच काही मागचे माझ्या गळ्याशी दाटले.

विजनातल्या सुपथावरी तुजला दिल्या शपथा किती,
रहदारिच्या रस्त्यावरी ते शब्द आता फाटले.

अयशात होतो धुंद अन् सुयशात झालो सुंद मी;
हरवून माझा ध्यास मी हे काय भलते गाठले.

पंखात होती झेप अन् डंखात होती चेतना;
मी पाय येथे रोवण्या ते पंख माझे काटले.

गर्दीत मी घुसलो किती; जेथे कोणी सोबती.
साथीस उरली सावली... हे सोंग माझे कोठले?

होता कुठे, आला कुठे - तो शाश्वताचा सारथी!
दर्याच सरला मागुती की सांडपाणी आटले?

जातक, १९६५

रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

गझल आरतीचा...


श्रीयुत चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांच्या मातोश्री कोकणातल्या कुठल्याशा गावात खानावळ चालवीत. हे महाशय तेथें गल्ल्यावर बसून कविता करीत. खानावळीत जेवायला येणाऱ्या काही काव्यरसिकांनी त्यांच्या कविता म्हणे चोरून ‘मौज’मध्ये प्रकाशनासाठी ‘आरती प्रभू’ या नावाने धाडून दिल्या आणि त्या चक्क छापून आल्या. एवढेच नव्हे तर रसिकांना खूपच भावल्या देखील आणि मराठी सारस्वताला ‘आरती’ विना हा ‘प्रभू’ गमला...! विंदानी आपल्या या सन्मित्राला उद्देशून एक कविता लिहिली आणि ती वाचतांना गझलच्या अंगाने गेल्यासारखी वाटली म्हणून तिचे नामकरण केले, ‘गझल आरतीचा!’... तोच हा गझल...

निस्तब्ध टिंबाभोवती बिंबावले ज्याचें जिणे
त्याची न निरखा पाऊले; काही अती, काही उणे.

ज्याला अनोखे जाहले हे ओळखीचे चेहरे,
त्याच्या खुळ्या शब्दांतुनी त्याची कथा का शोधणे?

आकाश कातळ जाहले तेव्हाच पूरहि संपला;
धरित परके वाहते; काठास का तें आणणे?

शोधीत गेली जी गती आकाशगंगेची मुळें,
कां तिला या फूटपट्या लाकडाच्या लावणे?

ध्यास नव्हता त्याजला तुमचें भलें करीनसा;
उसनी भलाई कासया पदरांत त्यांच्या बांधणे?

अध्यास ध्यासाचाच तो; श्वास तो असण्यांतला;
उपकार श्वासाचे न या निश्वास सोडुन संपणे.

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

मी...

 

मिटता शून्यवत,
उमलता विश्वरुप मी
धरती जेवढी तेवढाच
पसरतो व्योमी...!

रविवार, २१ जानेवारी, २०१८

हा रस्ता अटळ आहे !

सूज्ञ, विवेकी आणि संवेदनशील मनाची कुचंबणा आणि घुसमट मांडतांना देखील अत्यंत आशादायी आणि सकारात्मक शेवट करणारी विंदांची ही एक अद्भुत कविता जी अनेक अर्थाने एकमेवाद्वितीय ठरली. चित्रकर्त्यांना ती आपल्या निर्मितीच्या प्रचारासाठी एक प्रभावी साधन वाटली (गजेंद्र अहिरेचा चित्रपट - शासन), लेखकांना आपल्या अभिव्यक्तीस याहून समर्पक शीर्षक नाही असे वाटले (रामचंद्र नलावडे यांचा कथासंग्रह) तर इंग्रजीत शब्दश: अनुवाद केलेली माझ्या माहितीतील विंदांची ही एकमेव रचना (सुरेश रानडे यांचा ब्लॉग ज्ञानदीप). आज विंदांची ही १०१ वी कविता सादर करून मी माझ्या विंदांच्या जन्मशताब्दी उपक्रमाची सांगता करतो आहे, यापुढेही वेगवेगळ्या निमित्तांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रकटण्याचा प्रयत्न करीन, कारण माझ्यासाठी... हा रस्ता अटळ आहे!


माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !

अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे ! 

ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे !

येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य! 
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!
बन दगड आजपासून 
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !

अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड...!

शनिवार, २० जानेवारी, २०१८

रे खिन्न मना...!‘मरणात खरोखर जग जगते...’ केवळ चार शब्दात समग्र मानवी आयुष्याचा आशय मांडणाऱ्या कवीची ताकद त्याच्या अत्यंत प्रभावी आणि समृद्ध शब्दांनी ‘जगण्याला’ सहज कवेत घेते! हे लिहिणाऱ्या भा. रा. तांब्यांच्या, अशाच एका आशय’घन’ रचनेला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरसाज चढवून मराठी भावविश्वात अजरामर केले. अलीकडे आलेल्या ‘हाय वे – एक सेल्फी आरपार’ या उमेश कुलकर्णीच्या आणखी एका दर्जेदार निर्मितीच्या माध्यमातून आणि, चेहऱ्याइतकाच गळ्यातही गोडवा असलेल्या, रेणुका शहाणे यांच्या गुणगुण्यातून या जवळपासविस्मृतीत गेलेल्या गीताला स्मृतीपटलावर प्रवेश मिळाला होताचं; कालच्या सावनी रविंद्र प्रस्तुत ‘स्वर हृदयांतरी’मध्ये खुद्द पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्या तोंडून या भावगीताची महती निरुपण सदृश विवेचनातून ऐकतांना रसिकांना आपल्या भाग्याचा हेवा न वाटता तरच नवल! या गीतातील शेवटचा अंतरा सहसा गायला जात नाही अशी खंत व्यक्त करतांना पंडितजींनी तो संपूर्ण अंतरा विशद करून दाखविला आणि तो ऐकतांना आम्हाला वात्सल्य, प्रेम, प्रपंच, अध्यात्म असा सगळा भावानुभव एकत्रित मिळाला याचे कारण सूज्ञांस सांगणे न लगे...!

भा. रा. तांबेच्या ज्या गीताच्या नमनाला हे घडाभर तेल घातले ते गीत...

‘घन तमीं शुक्र बघ राज्य करी,
रे खिन्न मना, बघ जरा तरी...!’

आणि सहसा स्वरांत न गुंफलेला हा शेवटचा अंतरा...

'मना, वृथा कां भीशी मरणा?
दार सुखाचें तें हरि–करुणा!
आई पाही वाट रे मना,
पसरोनी बाहु कवळण्या उरीं...'


सोमवार, १५ जानेवारी, २०१८

अभिजातता...!


सुचेताताईंनी अत्यंत समर्पक आणि प्रभावी शब्दात मांडलेल्या ‘अभिजातताते’च्या व्याख्या केवळ रसिकांच्याच नव्हे तर त्यांच्या सोबत मंचावरील परिसंवादात सहभागी ‘कलाकारां’च्या देखील हृदयाचा ठाव घेवून गेल्या याचा दाखला म्हणजे पंडित सत्यशील देशपांडेंनी आपले विवेचन सुरु करण्यापूर्वी सुचेताताईंकडून त्या व्याख्या लिहिलेला कागद मागून त्या सर्व समीकरणांचे जाहीर पुनर्वाचन केले!

संगीत, नृत्य, चित्र अशा निर्विवादपणे अभिजात असलेल्या कलाप्रकारांच्या साधकांना त्यांना उमगलेले अभिजातातेचे स्वरूप उलगडून सांगण्याची आयोजकांची कल्पना जेवढी कल्पक तेवढीच, त्यामध्ये ‘व्यवसाय’ या क्षेत्राचा अभिजाततेवरील परिसंवादात अंतर्भाव करण्याचे धाडस उल्लेखनीय! श्री. दीपक घैसास यांनी स्वत:चा, ‘पंचपक्वानांच्या ताटातील ऑम्लेटचा तुकडा’ असा विनयशील परिचय देत, व्यवहारकुशलेतेची आस्वादक संवेदनशीलता आणि आध्यात्मिक रसिकता यांच्याशी सांगड घालत समृद्ध आयुष्य जगण्याच्या भानाचे जे नमुने पेश केले ते त्यांना उकडीच्या मोदकाचा दर्जा देवून गेले! ‘पायाने केला तर प्रवास होतो, हृदयाने केली तर यात्रा होते आणि भान हरपून केली तर वारी होते’ हे उदाहरण किंवा, ‘व्यवसायात रोज नव्याने येणाऱ्या आव्हानांना कुठलीही पुर्वनिश्चिती नसल्याने त्यांच्या हाताळणीत दाखवावी लागणारी सृजनशिलता हे अभिजाततेचे एक स्वरूप असू शकते’ या मांडणीतून त्यांनी पंडीत सत्यशीलजींचा ‘एकाच रागाची नव्याने सादरीकरणातील प्रयोगशीलता व ती प्रक्रिया म्हणजेच अभिजातता’ याचे ‘आधा है चंद्रमा...’ च्या उदाहरणासह केलेले स्पष्टीकरण अधोरेखित तर केलेच शिवाय ते त्यांच्या अभिजाततेची साक्ष देणारे देखील ठरले.

पंडितजींनी आपल्या खुमासदार शैलीत सांगीतिक पद्धतीने केलेली विषयाची उकल रसिकांची दाद मिळवून गेली आणि त्यांच्या ‘सतत नवीन शिकण्याची, प्रयोग करण्याची उर्मी हे जिवंत मनाचे आणि कंटाळा येणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे’ या विधानांबरोबरच ‘क्लासिक’च्या व्याख्येतील गमती जमती वरील मार्मिक भाष्य आणि पु. शि. रेग्यांच्या ‘आसमंत रोज नवा, ‘इथे-तिथे’ची वानवा!’ या ओळींनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

रवि परांजपे सरांनी दोन पाश्चात्य कलाकारांच्या आविष्कारांच्या उदाहरणातून ‘Great Minds Think Alike’ अथवा ‘ये हृदयीचे ते हृदयी...’ याचे दर्शन अभिजाततेचे एक अंग कसे असू शकते आणि दोन वा अधिक अवकाशांचा सहसंबंध आणि त्यातील अभिजातता काही चित्रांच्या उदाहरणातून उलगडून दाखवली.

सूत्रधार मिलिंद अग्निहोत्री यांनी सांगितले की पंडित सत्यशिलजींना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यासाठी भेटलो असता त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, ‘कार्यक्रम किती वेळाचा आहे?’, ‘दोन तासांचा...’ असे उत्तर मिळाल्यावर पंडितजी ताडकन म्हणाले, ‘जमणार नाही, या विषयावरील असा कार्यक्रम किमान चार दिवसांचा हवा, अन्यथा तुम्ही रसिकांसह सगळ्यांचाच वेळ फुकट घालवाल...!’

याचा जाणीवपूर्वक उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, कुणाचाही वेळ फुकट तर गेला नाहीच उलट मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अभिजनांच्या आश्वासक प्रतिसाद व सहभागाने अभिजाततेतील एका नवीन संक्रमणांस आयोजकांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले हे एक आणि दुसरे म्हणजे पंडितजींच्या तर्कास असुसरून या 'अमूर्त कल्पनेला मूर्त स्वरुपात बांधण्याच्या' या प्रयत्नाबद्दल कितीही लिहिले तरी अपूर्णच वाटेल. तेंव्हा तूर्तास, सृजनशील मनांना संवेदनांच्या अभिसरणाची अतिशय उत्तम संधी देण्याच्या प्रयोगाबद्दल रवि परांजपे फौंडेशनचे मन:पूर्वक आभार मानून या उपक्रमातील पुढील कार्यक्रमाच्या प्रतिक्षेत थांबावे हे उचित!

जाता जाता – सन्मित्र डॉक्टर सचिन चिंगरे यांच्याशी या विषयी चर्चा करतांना, ‘कुठल्याही निर्मिती प्रक्रीयेतील प्रामाणिक प्रयत्नांचे सातत्य म्हणजे अभिजातता...’ हे त्यांचे निरीक्षण आणि कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेपासून या क्षणापर्यंत आम्हाला या विषयाचे प्रतीकात्मक रूपक म्हणून दृष्टांत देणाऱ्या 'वडाच्या पारंब्यां'चा उल्लेख इथे सयुक्तिक व वाचकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा ठरावा!

न हि रसादृते कश्चिदर्थः प्रवर्तते...!